अक्कलखाते
निवडणुकीची गडबड सुरु होती, सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत काम , काम आणि काम ! एका - एका मतासाठी धावपळ सुरू होती, कारण निवडणूकच तशी प्रतिष्ठेची होती. संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत होता तसे तसे काम वाढत होते. सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रचारात गुंतल्यामुळे कार्यालय व्यवस्थापन, मीडिया, प्रचार नियोजन यासह अनेक जबाबदा-या माझ्या लहान खांद्यावर पडल्या होत्या. असाच एक व्यस्त दिवस...2 अनोळखी गृहस्थ कार्यालयात येतात...शिपाई निरोप घेऊन येतो. हातावरची कामे संपेपर्यंत तसेच त्यांना बसवून ठेवत नंतर हं बोला काय तुमचे ? म्हणून त्यांना अखेर विचारले. आम्हाला साहेबांना भेटायचे आहे त्यांचे उत्तर.. कोठून आलात या प्रश्नाला पुणे हे उत्तर येताच साहेब प्रचारात आहेत, निवडणूक संपल्यावर 28 तारखेला या म्हणून चक्क कटवण्याचे उत्तर दिले. पुणेकर माणसे ती तितकीच चिवट...अहो आमचे खूप महत्वाचे काम आहे या त्यांच्या विनंतीला ही साहेबांना वेळ नाही काय आहे ते मला सांगा म्हणत मी माझ्या कामात गुंतलो. मी दाद देत नाही हे पाहून ते कधी निघून गेली ते समजले नाही. पण आधी सांगितल्या प्रमाणे त्या चिवट माणसांनी माझ्या नकळत दुस-या दिवशी माझा डोळा चुकवून साहेब यांची भेट घेतली अन मला साहेबांचा फोन आला, प्रशांत पुण्याच्या त्या दोघांचे काय ते पहा इतकाच निरोप आला. मी हो सर सर म्हणत काल ज्या लोकांना अक्षरश: कटवले होते त्यांना आता शोधू लागलो होतो. 11 वाजताच ते दोघेही पुन्हा माझ्या समोर दत्त म्हणून उभे. आज साहेबांच्या फोनमुळे कालच्या पेक्षा माझा सूर बदलला होता, मी त्यांना चहा मागवून बोला म्हणून वीचारु लागलो. ते सांगू लागले, आमच्या कडे एक प्लॅन आहे, आम्ही एक सर्वे करणार आहोत, त्या सूचनेप्रमाणे तुम्ही काम केले तर तुम्हाला 11 हजार 648 मते नक्की मिळतील हि खात्री आहे. एका एका मतासाठी दारोदार फिरणा-यासाठी एक गठा सुमारे 12 हजार मते म्हणजे तर बंपर लॉटरीच की ! मी आता चहा सोबत बिस्कीट हि मागवली. मी विचारले तुम्ही आमच्या साठी हे का करताय ? तुम्हाला त्या बदल्यात काय हवंय ? यावर त्यांनी आमच्याच पक्षाच्या नेत्यांच्या काही ओळखी सांगितल्या, संदर्भ दिले आम्ही पण पक्षासाठी पडद्यामागून काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत हे सांगितले. हे एकूण आता माझा त्यांच्यावरचा विश्वास वाढू लागला होता, मी ठीक आहे करा तुम्ही काम , काय लागले तर सांगा असे सांगून निरोप दिला. 12 हजार मतांची लिंक सापडणार म्हणून मी मनोमन सुखावलो होतो, त्यांची आता वाट पाहू लागलो होतो. चार दिवसानंतर ते दोघे पुन्हा आले. आता मी यावेळी त्यांना नास्ता मागवला होता. त्यांच्या हातातील 12 हजार मतांचे पाकीट मला आता खुणावू लागले होते. मी त्यांना तो रिपोर्ट मागताच ते म्हणाले साहेब थांबा, आमचे एक काम करा असे सांगीतले. मी काय विचारताच आमची एक संस्था आहे त्याचे member व्हा इतकी मागणी केली. मी लगेच तयार झालो ... मेंबर फीस म्हणून 17480 रु मागितले. मला 17480 रु का असा प्रश्न पडला तर त्यांनी कसले तरी गणित केले आणि शुभ अंक कसा आहे हे माझ्या गळी उतरवले. आता माझा पक्का विश्वास बसला अन मी नव्या 2 हजारच्या 8 आणि बाकी 100 च्या सहजा सहजी न मिळणा-या नोटा त्यांच्या हातात दिल्या. त्यांनी त्यांच्या जवळचे पाकीट माझ्या हातात दिले आणि शुभेच्छा देऊन निरोप घेतला. ते जाताच मी अधाशासारखा त्या पाकिटावर तुटून पडलो ते उघडून पाहिले अन त्यातील एका कागदावर लिहिलेल्या दोन ओळी वाचुन डोक्यावर हात मारुन घेत, सोफ्यावर धपकन खाली बसलो. त्या पाकिटात लिहिले होते, तुमच्या गावातील 12 हजार बाहेरगावी आहेत, मतदानाच्या दिवशी त्यांना घेऊन या , हि मते तुम्हाला नक्की मिळतील. या 2 ओळी होत्या. यात नविन काही नवीन असं काही नव्हतो. प्रत्येक निवडणुकीत बाहेर गावचे मतदार आणले जातात. त्या मुळे आपण फसवले गेलो हे लक्षात आले. रात्री साहेबांना हा किस्सा सांगीतला, त्यांनी काही न बोलता डोळ्यांनीच जे बोलायचे ते सूचित केले. पुन्हा मी साहेब यांना एक प्रश्न विचारला , साहेब हे 17480 रु. कोणत्या खर्च खात्यात टाकू ? साहेब म्हणाले तुमच्या #अक्कलखात्यात टाका !
दुस-या दिवशी माझ्या सारखेच निवडणुकीत व्यस्त असलेल्या रोहित, संतोष ला फोन करुन सावध राहा रे , लोक अशा प्रकारे फसवत आहेत म्हणून सांगितले तर दोघांचे एकच उत्तर आले, अरे प्रशांत तुझे #अक्कलखाते काल उघडले का ? आमचे तर मागच्याच आठवड्यात सुरु झाले आहे.
©प्रशांत जोशी