Monday, November 21, 2016

मी आणि माझी टि.व्ही पत्रकारिता--Tv पत्रकार ते pro

प्रस्तावना ......

              मुंबईतील tv ( इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांचा दरवर्षी न्यूज रूम लाईव्ह हा दिवाळी अंक प्रसिद्ध होतो. मागील 7 वर्षांपासून मुंबईत काम करीत असल्याने या पत्रकारांशी चांगलाच स्नेह जुळला आहे, मैत्री झाली आहे. मी सुरुवातीच्या काळात tv पत्रकारिता केलेली असल्याने आणि आता pro म्हणून याच माध्यमांशी निगडित असल्याने माझा tv पत्रकार ते pro असा प्रवास असे लिखाण करावे असा आग्रह काही मित्रांनी केला. त्यावरून लिहिलेला हा छोटेसे प्रवास .......
              काल या अंकाचे मुंबईत प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले , निवडणुकीच्या प्रचारात असल्याने या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहता आले नाही  ही रुखरुख मात्र राहिली...

▶ सन 1995 सालची गोष्ट असेल...नुकताच बारावी पास होऊन बाहेर पडलेलो...इंजिनिअरींगला प्रवेश मिळवुनही घरच्या परिस्थितीमुळे अवघी चार हजार रूपये फिस भरणे ही शक्य नसल्याने मिळालेला प्रवेश रद्द झाला आणि शिक्षणाची नाळ तुटली ती कायमचीच...नावाला स्थानिक कॉलेजात बी.एस्सीला प्रवेश घेऊन काही तरी काम धंदा करायचा या उद्देशाने वयाच्या 19 व्या वर्षीच पत्रकारिता सुरू केली.
▶वडिलांचा पत्रकारितेचा वारसा असल्याने एका स्थानिक दैनिकात चारशे रूपये पगाराची उपसंपादक म्हणुन नौकरी मिळाली. दिवसभर शहरात फिरून बातम्या गोळा करायच्या आणि रात्रौ उशीरा एक-दोन वाजेपर्यंत पुर्ण अंकाची एक प्रत हातात पडे पर्यंत प्रुफ रिडींग, बातम्या लिहीणे, पाने लावणे ते संपादकिय लिहीण्या पर्यंतची सर्व कामे करावी लागायची. त्यावेळी शहरातच नाही तर जिल्ह्यातही ऑफसेट यंत्रणा आलेली नसल्याने हे दैनिक ट्रेडल मशिनवर खिळ्याची जुळवणी करून तयार व्हायचे. रात्री वर्तमान पत्राचे काम रेंगाळत गेले की रिकाम्या वेळात त्या खिळ्यांवर टाईमपास म्हणुन कंपोझींगही शिकलो. दिवसभर उन्हात फिरून आणि रात्री कंपोझींगच्या कामामुळे चेहर्‍या सोबत हातही काळे झालेले असायचे.
▶कालांतराने वर्ष सहा महिन्यातच ट्रेडल दैनिकाचे ऑफसेट दैनिकात रूपांतर झाले. ऑफसेट दैनिक हा नविन प्रकार, त्यात नव्याने सुरू केलेली पत्रकारिता यामुळे सातत्याने नव्याचा ध्यास असायचा...नव नविन कल्पना सुचायच्या आणि त्या दैनिकाच्या माध्यमातुन उत्साहाने राबवायच्या हा दिनक्रम असे...त्यावेळी दुरदर्शन वरील मराठी बातम्या आणि काही तुरळक ठिकाणी आज तक चॅनलच्या हिंदी बातम्या सोडता बातम्यांची चॅनल्स नव्हती. शहरातील दोनशे-चारशे ठिकाणी केबलद्वारे ही चॅनल्स दिसायची...त्यावेळी आमच्या दैनिकाची बॅनर लाईनही साडे सातच्या दुरदर्शनवरील मराठी बातम्या पाहुन ठरायची...दैनिक स्थानिक असले तरी संपादकांच्या आग्रहामुळे बॅनर लाईन मात्र पुणे-मुंबईपासुन ते अगदी अमेरिकेतल्या घटनेवरचीच असायची.
▶असाच एकदिवस बातम्या पाहताना डोक्यात कल्पना आली की आपल्याही अशा सिटी न्युज सुरू करता येतील का ? आणि त्या क्षणापासुन ध्यास लागता तो सिटी न्युज सुरू करण्याचा. बरीच विनवणी केल्यानंतर शहरातच्या सिटी न्युज चालकाने मी काही खर्च देणार नाही तुम्ही बातम्याची कॅसेट तयार करून द्यायची मी तीन वेळा ती दाखवील या अटीवर बातम्याला परवानगी दिली...त्यानंतरचा शोध म्हणजे कॅमेरामनचा. शहरातल्याच एका उत्साही आणि नव्यानेच व्यवसाय सुरू केलेला कॅमेरामन यासाठी तयार झाला तो या अटीवर की मला ऑर्डर असल्यानंतर तुमच्या बातम्या गोळा करण्यासाठी मी येणार नाही. पुढचा शोध होता तो मिक्सींग करणार्‍याचा आणि स्टुडिओसाठी जागेचा. आणखी एक शहरातचा लग्नाची व्हिडिओ कॅसेट मिक्स करून देणारा मित्र सहजासहजी तयार झाला मात्र स्टुडिओसाठी जागा शोधतांना घरातल्याच एका खोलीवर येऊन तो थांबला आणि आमचे परळी सिटी हे न्युज चॅनल सुरू झाले.
▶उत्साहाने हे सुरू तर केले मात्र वर्तमान पत्रातील नौकरी आणि या बातम्या हे सांभाळताना चांगलीच कसरत होऊ लागली. माझ्या पासुन ते कॅमेरामन पर्यंतचे सर्वच नविन त्यामुळे अनेक गोंधळ उडु लागले. मजेशिर प्रसंग घडु लागले. सुरूवातीस मी स्वतःच चार दिवस बातम्या देण्याचा प्रयत्न केला मात्र वाणीत असलेला दोष माझे मलाच लक्षात आल्याने निवेदक होण्याचे स्वप्न तेंव्हाच थांबले ते कायमचे...मग सुरू झाला शोध तो बातम्या देणार्‍या निवेदीेकेचा... शहरातील काही उत्साही महिला भगिणी तयार झाल्या मात्र त्या बातम्या देण्यासाठी हळदी-कुंकुवाला जाताना नटुन-थटुन जातात त्याप्रमाणे तयार होऊन यायच्या. एखादी निवेदीका बातम्या सांगताना जी खाली मान घालुन वाचायची ती मान संपुर्ण बातम्या संपल्यावरच वर व्हायची. दुसरी निवेदीका शाळेतल्या वकृत्व स्पर्धेत पाठ करून आलेल्या मुली ज्याप्रमाणे सुसाट वेगाने पाठ करून आलेले विसरायच्या आत आपले भाषण संपवायच्या त्याप्रमाणे बातम्या संपवायच्या.
▶दिवसभर फिरून बातम्या गोळा करतांना कधी सायकलीवर तर कधी कॅमेरामनसह तीघेजण एकाच बजाज कंपनीच्या 100 वेळा किक मारून सुरू होणार्‍या स्कुटरवरून शहराची रपेट व्हायची. कधी कॅमेरामन शुटतर करायचा मात्र ते रेकॉर्डच व्हायचे नाही. तर त्याला लग्नाची ऑर्डर आली की आमच्या बातम्या म्हणजे विदाउट फुटेज नुसतेच बातम्या वाचन. इथे ही दैनिकाप्रमाणे दुरदर्शनवरील सातची पहिली ठळक बातमीच आमच्या सिटी न्युजची मुख्य बातमी असायची.
▶सत्तर हजाराचे छोटेसे गांव त्यात अशा रोज कितीशा घटना घडणार ? म्हणुन मग बातम्यांमध्ये ब्रेक आणि त्या ब्रेकमध्ये जाहिराती सुरू करण्याची कल्पना सुचली. केवळ 50 रूपये घेऊन घरातल्या लहान मुलांचे वाढदिवस रेकॉर्ड करून ते बातम्यांमध्ये दाखवायचे तर कधी दोनशे रूपयात शाळेच्या गॅदरींगचा कार्यक्रम थोडक्यात दाखवायचा. दसरा, दिवाळी सारख्या सनाला शहरातच्या पुढार्‍यांच्या शंभर-दोनशे रूपयात शुभेच्छाही गोळा करून त्या माध्यमातुन थोडी कमाई होऊ लागली होती. अनुभवातुन सर्व स्थिरस्थावर होऊ लागले होते. एक चांगली निवेदीका मिळाली, मिक्सींगही व्यवस्थित जमु लागले आणि एकाच्या जागी दोन कॅमेरामनही तयार झाले. सिटी न्युज हा नविन प्रकार शहरात चर्चेचा विषय बनु लागला. टि.व्हीवर दिसणेच ही कल्पनाच सुखावह असल्याने जोरदार प्रतिसाद मिळु लागला, कार्यक्रमाला लोक आवर्जुन बोलावु लागले. पाहता पाहता शहरातील केबल कनेक्शनची संख्याही वाढु लागली. दैनिकाच्या संपादकांनीच त्याचा जोडुन या चॅनलची जबाबदारी घेत छानसा स्टुडिओ, पुर्ण वेळ शहरात फिरण्यासाठी पेट्रोलसह स्कुटर आणि बरेचसे स्वातंत्र दिले.
▶आमचा उत्साह आता द्विगुणीत झाला होता. युतीच्या कार्यकाळात गाजलेले गो.रा.खैरनार हे सभेसाठी परळी शहरात आले असतांना त्यांची घेतलेली मुलाखतही माझ्या आयुष्यातील पहिली मुलाखत ठरली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे ही एका लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान आले असता त्यांचीही मुलाखत घेण्याचे भाग्य लाभले. मुलाखत म्हणजे विदाउट बुम असायची. शहरातील नेतृत्व स्व.गोपीनाथरावजी मुंडे हे त्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री. त्यामुळे शहरात कार्यक्रमांची अक्षरशः रेलचेल...दिवसभर त्यांचे कार्यक्रम कव्हर करायचे आणि रात्री उशीरा मुलाखतीसाठी बारा-एक वाजेपर्यंत ताटकळत बसायचे. सर्व माणसे संपल्यानंतर ते बोलवायाचे मात्र त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वा समोर प्रश्‍न विचारण्या ऐवजी समोर उभा ठाकणे ही धाडसाचे व्हायचे. त्यामुळे स्वतःच ते त्यांना जे सांगायचे ते सांगायचे आणि आमचे काम हलके करायचे. शहरातल्या एका छोट्या न्युजला त्यांनी कधीच टाळले नाही हे ही न विसरता येण्या सारखे.
▶ 1997 साली परळीत झालेल्या साहित्य संमेलन कव्हर करतांनाही अनेक गमती-जमती घडल्या. नामवंत साहित्यीकाचे नाव ऐकलेले असायचे या मोठ्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला गेल्यानंतर त्यांना प्रश्‍न काय विचारावेत हे मात्र माहित नसायचे. अशा वेळी काही जन हसुन चार शब्द बोलायचे तर काही जन चक्क चला तुम्हाला विचारता येत नाही तर आलात कशाला म्हणुन हाकलुन द्यायचे. याच साहित्य संमेलना दरम्यान परळीत घडलेल्या रेल्वे अपघाताचे रात्री दोन वाजता जावुन केलेले कव्हर आणि सकाळी सातलाच दिलेल्या विशेष बातम्यांमुळे सिटीन्युजची लोकप्रियता प्रचंड वाढली. या अपघाताला भेट देण्यासाठी आलेल्या तत्कलीन रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांच्यासोबत संपुर्ण दिवस घालवला जाताना त्यांनी आमच्यातील उत्साह पाहुन पाठीवर थाप दिली. या सिटी न्युजच्या लोकप्रियतेमुळे आता केबल चालकाकडुन आम्हाला मानधन मिळु लागले होते.
▶ याच दरम्यान मी दैनिक देवगीरी तरूण भारतचा शहर प्रतिनिधी म्हणुन काम करू लागलो होतो. देवगीरी तरूण भारतचे पालक स्व.प्रमोदजी महाजन यांनी तरूण भारतच्या सर्व जिल्हा प्रतिनिधींची एक बैठक परळी शहरात घेतली. त्याबैठकीत त्यांनी पत्रकारितेवर अनमोल मार्गदर्शन केले. आगामी काळात इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे महत्व प्रचंड वाढणार आहे. त्यादृष्टीकोनातुन काय करता येईल ते पहा असा सल्ला दिला. आज इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे वाढलेले प्राबल्य पाहता त्यांची दुरदृष्टी किती होती हे लक्षात येते. मुलाखत घेताना पत्रकाराचा चेहरा कसा निर्विकार हवा आणि मुलाखत घेत असलेल्या व्यक्तीच्या कोणत्याही उत्तरामुळे चेहर्‍यावरचे भाव ढळु न देता आणि आपल्याला त्याच्याकडुन जे हवे आहे ते काढुन घेताना कुठेही आपल्या मनाचा थांगपत्ता लागु न देता मुलाखत घेतली पाहिजे हा धडा दिला.
▶ही सर्व घडी व्यवस्थित बसली असतांनाचा लग्नाचे वय होऊ लागल्याने लग्नाचे वेध लागु लागले मात्र पत्रकारांना कोणी सहसा मुली देत नाहीत या ग्रामीण भागातील अनुभवाचे चटके बसु लागले. त्यामुळे पत्रकारिता सोडुन लग्नासाठी मुंडे साहेबांच्या एका संस्थेत जनसंपर्क अधिकार्‍याची नौकरी धरावी लागली. आणि माझी पत्रकारिता संपली.
▶ त्याच काळात म्हणजे 2002 मध्ये राजकारणाची सुरूवात करणार्‍या आजचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे साहेबांशी संपर्क आला. सुरूवातीला त्यांच्या बातम्या देण्यापासुन ते पी.ए.आणि पी.आर.ओ कधी झालो हे समजलेच नाही. आज त्यांच्या सोबत काम करतांना दौर्‍याच्या आखणी पासुन अधिवेशन काळातील प्रश्‍नांपर्यंत सर्व कामे पहावी लागत असली तरी मन मात्र बातम्यांमध्ये अधिक गुंतलेले असते. एका चांगला पत्रकार एक चांगला पी.ए, पी.आर.ओ होऊ शकतो. सुरूवातीच्या काळात केलेल्या पत्रकारीतेचा फायदा आज त्यांच्यासोबत काम करतांना होतो. बातम्यांचे महत्व माहित असल्याने घटना घडण्याच्या आधीच बातमी देण्याची धडपड असते. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सोबतच फेसबुक, ट्विटर या नविन माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत, माध्यमांपर्यंत कसे पोहोचायचे याचे कसब अंगी आले आहे.
▶सोळा वर्षाचा धनंजय मुंडे साहेबांच्या सततच्या सहवासामुळे मने अशी जुळली आहेत की कोणती बातमी कशी द्यावी हे कधी ही विचारावे लागले नाही किंवा दिलेल्या बातमीत कधी चुक काढुन त्यांनी कधी रागावले ही नाही. कधी-कधी बातम्यांच्या अती घाईत एखादी चुक झाली तरी ते सहज समजुन घेतात. आज त्यांचा पी.ए, पी.आर.ओ स्थिरावलो असलो तरी मन मात्र आजही टि.व्ही पत्रकारीते मध्येच गुंतलेले असते. त्यामुळे मुंबईतील कमलेश सुतार असो की सागर, मंगेश, अमित, विलास हे पत्रकार मित्र असो त्यांच्याकडे पाहिले की मी स्वतःला त्यांच्यात पाहुन समाधान मानत असतो.

*प्रशांत जोशी*
Pa/ pro to lop धनंजय मुंडे



No comments:

Post a Comment