Friday, September 16, 2016

कुबेर गप्पा

#कुबेर_गप्पा – प्रशांत जोशी
नमस्कार मंडळी...
पुन्हा एकदा आपण हजर आहोत एका अशा कुबेराशी गप्पा मारण्यासाठी ज्याला अनेक जण वेगवेगळ्या कारणाने ओळखतात. त्यांची ओळख फक्त एकाच शब्दात करायची झाली तर ‘भाबडा’ हा एक शब्द देखील पुरेसा आहे. बरोबर... आपण आपण गप्पा मारणार आहोत भाबडे प्रश्न पडणारे प्रशांत जोशी यांच्याशी. चला तर मग त्यांनाच प्रश्न विचारून आपण भंडावून सोडू.
>>  नमस्कार सर...
प्रशांत सर :  नमस्कार...
>>  सर्वप्रथम कुबेरकरांशी गप्पा मारण्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद... गप्पांची सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न विचारणार आहे तो आहे राजकारणाबद्दल. तुम्ही नोकरीच्या निमित्ताने राजकारणाशी जोडलेले आहात. स्वतः राजकारणी नसले तरी तुमचा या गोष्टीशी खूप जवळचा संबंध आहे. पण सामान्य माणसाला मात्र त्यातील फारसे काहीच समजत नाही. तो राजकारणाबद्दल दोन अगदी विरुद्ध टोकाचे ग्रह बनवून घेतो. कारण त्याला राजकारण समजते ते एकतर चित्रपटातून किंवा टीव्हीवरील बातम्यांमधून. माझा प्रश्न असा आहे की चित्रपटात दाखविले जाणारे राजकारण आणि प्रत्यक्षातील राजकारण यात किती फरक असतो? तसेच स्विय सहाय्यक ( PA ) यांच्या कामाचे स्वरूप काय असते?
प्रशांत सर :  माध्यमांनी पोलिसांची जशी निगेटिव्ह प्रतिमा केली आहे, तशीच राजकारणी माणसाचीही केली आहे. जी पूर्णपणे नाही म्हणणार, पण 90 % चुकीची आहे. चित्रपटातील दाखवले जाणारे राजकारण आणि प्रत्यक्ष यात जमीन अस्मानचा फरक आहे. तुम्ही आम्ही नोकरशहा एकदाच परिक्षा पास होतो आणि आयुष्यभर निश्चित होतो. राजकारणी माणसाला मात्र दर पाच वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. आणि परीक्षक असतात 3 लाख मतदार. एकच सांगतो जे जवळून पाहिले म्हणून खात्रीने सांगू शकतो. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण... आणि... जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे..!!! बाकी PA बद्दल एका वाक्यात सांगायच तर PA हा नेत्यांची सावली असतो. त्यांचे कान आणि डोळे तोच असतो. नेत्याच्या सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी त्याने घ्यायची असते. चांगल्या PA मुळे नेत्याचा TRP वाढतो तसेच PA ने चुकीची कामे केल्यास त्याची फळे ही नेत्याला भोगावी लागतात. याचीही अनेक उदाहरणे या महाराष्ट्रात आहेत.
>>  क्या बात है सर... खरे तर राजकारण या विषयाबद्दल सामान्य माणूस खूपच अनभिज्ञ असतो. तुमच्यामुळे या गोष्टी समजल्या. आता पुढचा प्रश्न... मंत्रालयात काम करत असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांचेही काम अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्याबद्दलची एखादी आठवण सांगू शकाल?
प्रशांत सर :  आबा म्हणजे एक महान व्यक्तिमत्व ! त्यांच्या सहवासातील माझा एक अनुभव सांगतो!!! स्व.आर.आर.पाटील उर्फ आबा यांनी जिल्हा परिषद सदस्या पासुन ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक पदे भुषवली आहेत. पण सुरूवातीच्या काळात आबा हे  माझ्या सारखेच तासगावचे तत्कालीन नेते दिनकर आबा पाटील यांचे स्विय सहाय्यक होते. हा इतिहास फार कमी लोकांना माहित असेल. त्यामुळेच स्विय सहाय्यकांबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी मला एकदा त्यांच्या सहवासात जाणवली.  मा.धनंजय मुंडे साहेब यांच्या सोबत एक दिवस आबांच्या कार्यालयात असतांना त्यांच्या मुंबईतील स्विय सहाय्यकाने दिवाळीतील चार दिवसांचा दौरा अंतिम करण्यासाठी आबांना दाखवला. दिवाळीच्या या चार दिवसात सोबत पी.ए कोण राहणार असा प्रश्नस विचारला असता दौरा दाखवणार्याय मुंबईच्या कार्यालयीन पी.ए ने आपल्या गावाकडील पी.ए सोबत असतील असे सांगितले. यावर आबांनी अगदी त्याच्यावर थोडेसे रागात येत आमच्या गावाकडच्या सामान्य पी.ए यांना दिवाळी नाही का? वर्षभर ते कामात असतातच. त्यांना दिवाळी साजरी करू द्या  आणि मुंबईतील तुमच्या पैकी कोणी तरी एका पी.ए ने चार दिवस दौरा करून गावाकडचीही दिवाळी पहा असा आदेशच काढला. असा हा गावाकडच्या PA चीही आपुलकीने काळजी करणारा नेता!!!  आणखी एक - आपल्याकडे पोलिसांवर नेहमीच टीका होत असते. आज त्यांच्यावर होणा-या हल्ल्यांमुळे थोडी सहानभूती वाटत आहे. पण अधिवेशनात ज्या ज्या वेळी पोलिसांवर टीका व्हायची त्या प्रत्येक वेळेस आबा पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे.
>>  अफलातून... सामान्य माणसाला नेते आणि त्यांचे आयुष्य कसे असेल, त्यांचे वागणे कसे असेल याची माहिती नसते. प्रसारमाध्यमे ज्या गोष्टी बोलतात त्यानुसार त्या नेत्यांबद्दल माणसाचा एक नकारात्मक ग्रह होऊन बसतो. असे अनुभव एकंदरीतच राजकारणी माणसाच्या माणुसकीचे दर्शन घडवतात आणि आपण समजतो तसे राजकारण अगदीच वाईट नाहीये तर त्यातही अनेक सकारात्मक बाजू आहेत हे यावरून समजू शकते. राजकारणी नेत्यांची सकारात्मक बाजू देखील सामान्य माणसांसमोर यावी यासाठीच हा प्रश्न विचारला होता. असो. आता थोडेसे मागे जाऊ. चार वर्षांपूर्वी मंत्रालयाला आग लागली त्यावेळेस तुम्हीही तिथेच होतात. त्याबद्दल काही सांगू शकाल?
प्रशांत सर :  आयुष्यातला तो एक कधी न विसरता येणारा दिवस होता. 57 मिनीटाचा मृत्यूचा थरार जवळून अनुभवला. यावर मी ग्रुप मध्ये सविस्तर पोस्ट केली आहे, ती थोडक्यात मांडता येणार नाही म्हणून मी त्या पोस्टची मी माझ्या ब्लॉग वर लिहिलेली लिंक शेअर करतो. कोणाला वाचायचे असल्यास नक्की वाचा...
>>  खूपच थरारक अनुभव. आता जरा काहीसे हलके फुलके वातावरण करू. आजकाल तुम्हाला बरेच जण भाबडे जोशी म्हणूनही ओळखू लागले आहेत. त्याचे कारण म्हणजे तुम्हाला पडणारे भाबडे प्रश्न. मला सांगा... सगळ्यात पहिला भाबडा प्रश्न तुम्हाला कधी, कसा आणि कोणता पडला होता? तसेच तुम्ही एखादा भाबडा प्रश्न वहिनींना विचारला आणि त्याचे अगदी खरमरीत उत्तर आले असे कधी झाले आहे का?
प्रशांत सर :  तसा मी परळीचा, जन्मलो, वाढलो, घडलो, बिघड़लो परळीमधे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक परळीचे वैद्यनाथ. त्या भोळया शंकराचा ‘भाबड़े’पणा आपसुकच अंगात भिनला. या चालु जगात खूप हुशार राहून चालत नाही. म्हणून आपलं भाबड बनून राहायचं. हत्ती होऊन लाकड तोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणं कधी ही चांगल. मी अगदी लहान असल्यापासून असले भाबडे प्रश्न लोकांना विचारात आलो असल्यामुळे नेमका पहिला प्रश्न मात्र मला सांगता येणार नाही. बाकी तुमच्या उपप्रश्नाबद्दल बोलायचे झाले तर... घरी काही विचारायची सोय असते का हो? हाहाहा... पण खरं सांगू... माझ्या सारखीच वैभवी पण भोळ्या भाबड्या शंकराची भोळी भाबडी पार्वती आहे. ती जीवनात आली अन दिवस बदलत गेले. पाठीवर बि-हाड घेवुन वावरणारा पेशा, पण समर्थ पणे तिने संसार सांभाळला. मी अजूनही स्वतःला यशस्वी समजत नाही पण जेंव्हा केंव्हा होईल त्यामागे फक्त वैभवीच असेल..!
>>  वा... ग्रेट... हे मात्र खरं की माणसाच्या यशात त्याच्या जोडीदाराचा सिंहाचा वाटा असतो. पुढचा माझा भाबडा प्रश्न. तुम्ही मिश्किल आहात. रक्तदान करता हे काही पोस्ट वरून समजले, बसण्याच्या गोष्टीही नेहमी करता. त्यावरून पडलेला भाबडा प्रश्न असा की तुमच्या रक्तात नक्की काय जास्त आहे? मिश्किलकी? मदिरा? की राजकरण?
प्रशांत सर :  तिन्ही ही..! मिश्किल मी आहेच. राजकारणावर पोट भागत म्हणून ते नसा नसात भिनल आहे. आणि मदिरा म्हणाल तर त्याने नशा येते, अन मला नशा आहे ती कामाची, इतरांना मदत करायची.   
>>  वा... छानच... आता जाता जाता कुबेर बद्दल. कुबेर मधील अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला तितकीशी आवडत नाही?
प्रशांत सर :  अडमीनचा हंटर अन नारळ..! थोडा काय दंगा केला की हंटर दाखवतो. अर्थात हे गमतीने हं..!!! नाही तर नारळ डोक्यात पडायचं... आत्मस्तुती करणारे, स्वत:च्या मोठेपणाला कुरळणारे आवडत नाहीत... ते कुबेरवरच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही अशी लोक आवडत नाहीत. राजाचा रंक होताना खुप पाहतो आम्ही राजकारणात. तेंव्हा सगळ असतानाही जमिनीवर राहणारे भाबड़े लोक भावतात, मन तिथच जुळत... अशाच लोकांसोबत बसायला आवडत, बसल्यावर बिल त्यांनीच दिल तर आणखी प्रसन्न वाटत... हेहेहे... एकच सांगतो... चांगलं ते घ्यावं, वाईट ते गंगेत घ्यावं.... मी असेच चांगले मोती वेचतो.
>>  वा... अप्रतिम उत्तरे. खरे तर तुम्ही राजकारणात असल्यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा जरा जास्त प्रश्न विचारण्याचा माझा प्रयत्न होता. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगदी बिनधास्त दिलीत. पुन्हा एकदा कुबेरकरांशी मनमोकळा संवाद साधल्याबद्दल खूप खूप आभार.
तर मंडळी. हे होते आपले भाबडे जोशी. त्यांनी खूप छान आपल्याशी गप्पा मारल्या. आज आता वेळेअभावी इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूच आपण पुढील भागात, एका नवीन कुबेराशी गप्पा मारण्यासाठी. तो पर्यंत... नमस्कार...
मिलिंद जोशी, नाशिक...




2 comments: