# *मोती_मॅनेजमेंट_गुरू*
मुंबईच्या नरिमन पॉईंट भागातले #मनोरा हे आमदार निवास तुमच्या पैकी किती लोकांनी पाहिले आहे ? 14 मजल्याचे एक याप्रमाणे 4 टॉवरची वरून पाहिले तर ताजमहाल सारखी भासणारी बिल्डिंग म्हणजे हे आमदार निवास. प्रत्येक मजल्यावर 6 ब्लॉक. म्हणजे एकूण 336 ब्लॉक. या प्रत्येक ब्लॉक मध्ये आमदार, त्यांचा pa, बॉडीगार्ड, ड्रायव्हर असे किमान 5 याप्रमाणे जवळपास 1500 लोक कायम राहणारे. याशिवाय राज्याच्या विविध भागातून दररोज मुंबईत मंत्रालय, शासकीय आणि व्यक्तिगत कामासाठी येणारे असंख्य लोक....ज्याची मोजदाद ही करता येणार नाही.
4 टॉवरच्या मध्यभागी सेंट्रल ac असलेली भव्य कॅन्टीन.... जनरल स्टोअर्स, सलून, लॉन्ड्री सह दैनंदिन लागणा-या सर्व वस्तू मिळण्याची दुकाने.. हे सगळं सांगण्याचा प्रपंच वेगळाच आहे....
या बिल्डिंग च्या गाड्या जाण्यासाठी असलेल्या out गेट आणि पायी जाण्यासाठी असलेल्या in गेटच्या समोर एका मोठ्या झाडाखाली असलेली मोतिची चहाची टपरी....या मोती कडे जो चहा मिळतो तसा चहा मुंबईत तुम्हाला कोठेच मिळणार नाही. भव्य कॅन्टीन मध्ये सवलतीच्या दरात चहा मिळत असला तरी या मोतीच्या चहाची चव त्याला नाहीच, त्यामुळेच या 336 ही ब्लॉकला चहा जातो तो याच मोती कडचा...
अगदी सकाळी 6 पासून ते रात्री 8 पर्यंत... नेहमी चहासाठी वाजणारी स्टोव्हची भरभर आणि आजूबाजूला 20-50 चहाच्या प्रतीक्षेतील ग्राहक....
मला हा मोतीचा चहा तर आवडतोच पण माझ्यावर खास प्रभाव पडला तो या मोतीच्या मॅनेजमेंट च्या स्किलचा....
उत्तर प्रदेश किंवा बिहारचा असलेला हा मोती भैया , नावाशिवाय कोणालाच काही माहिती नाही. 4 भाऊ, कोणालाही मोतीच म्हणा, हा साब बोलो क्या दु , हेच प्रत्येकाचे उत्तर,... एक चहा बनवत असतो, एक तिथेच फक्त मस्का पाव विकत असतो तर तिसरा पैसे आणि ऑर्डर घेत असतो... चौथा गावी असतो,.. दर 3 महिन्याला त्यांच्या ड्युटी बदलत असतात, एक गावी जातो तर आज पैसे घेणारा, ड्युटी बदलली की पाव विकताना दिसतो आणि पाव विकणारा चहा बनवताना दिसतो....
बर भांडवल काय तर फक्त मोठा स्टो, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वेगवेगळ्या चहाचे 10-20 थर्मास, आणि 100 एक काचेचे ग्लास.... एक साधा 1500 रु चा फोन, त्या फोनवर 336 खोल्या मधून येणा-या ऑर्डर घ्यायच्या, ना कोणती नोंदवही की काही रेकॉर्ड, आला फोन की ऑर्डर रेडी, .... बर या मोतीला या 336 खोल्या मधील माणसाच्या आवडी निवडी इतक्या तोंडपाठ की , समजा मी फक्त - मोती B -45 म्हणायला अवकाश की तो , हा साब, एक दूध, एक कॉफी , 2 चाय एक ब्लॅक टी बराबर का म्हणून आपल्याच आपली ऑर्डर सांगणार... जास्त काही बदल असला की सांगायचा, वर तो न चुकता साब, मस्का पाव भी भेजू क्या विचारणार.... गावाकडून येणा-या माणसांना या मस्का पावचे मोठे आकर्षण.... कारण ते कॅटीन मध्येही मिळत नाहीत आणि गावीही नाही, पाव भेजो म्हटल की, चीज , जाम लगावू क्या म्हणून इच्छा नसतानाही अतिरीक्त 2 रु चा पाव 20 रु ला गळ्यात घालणार...
चहा घेऊन येणारे up , बिहारचेच पोर असावेत, चौदा मजले दिवसातून किती तरी वेळा खाली वर करताना अजिबात कंटाळत नाहीत, तुमचा चहा संपेपर्यंत तिथेच बाहेर थांबतील, रिकामे ग्लास आणि बिल नगदीच घेवून जातील... कारण रिकामे ग्लास पुन्हा परत येत नाहीत असा त्यांचा अनुभव, तर रोज माणसे बदलत असल्याने बिल फिर दूगा म्हणावे तर बाद मे मिळते नही साहब म्हणणार..... आणखी एक म्हणजे 20 रु चा फक्त एक चहा घेतला आणि आपण 2 हजारांची नोट दिली तरी 1980 रु चे चिल्लर तयारच.... पण चिल्लर अभावी 20 रु बाकी ठेवणार नाहीत आणि छुटा नही है म्हणून चहाची ऑर्डर ही नाकारणार नाहीत.....
दर 2 दिवसाला मनपाचे अतिक्रमण हटाव पथक आणि पोलिसांची गाडी आली की त्यांचे स्टोव्ह जप्त, पण धंदा बंद नाही ठेवणार, तिथेच लपवून ठेवलेला दुसरा स्टोव्ह काढणार आणि पुन्हा व्यवसाय सुरू.....
परवा मुंबईत 2 हजार ची नोट टॅक्सीचे भाडे देण्यासाठी दिली, त्याच्याकडे चिल्लर नाही. 2 हजारांची नोट घेऊन 10 ठिकाणी फिरलो, कोणीच चिल्लर द्यायला तयार नाही, अगदी गरज नसतांना 100 रु ची खरेदी करायची तयारी दाखवूनही आपले मराठी व्यावसायिक चिल्लर द्यायला तयार होईनात, शेवटी मदतीला आला तो मोतीच.. फक्त साब एक चाय पिके जावो, अद्रक वाली बनायी है, आपकी fev, म्हणत चहा घ्यायला लावला आणि 1980 रु परत दिले....
*किती लहान लहान गोष्टीतून व्यवसायाचे मॅनेजमेंट शिकायला मिळते ना ?*
तर मग कधी येताय ,मोतीचा चहा प्यायला आणि मॅनेजमेंट शिकायला ....