Sunday, June 5, 2016

मंत्रालयातील आगीचा थरार

साधारण 3 वर्षापुर्वीची ही गोष्ट !!
 22 जून 2012 , वेळ दुपारी 2 च्या आसपासची . मुंबईतल्या आमदार निवासच्या आकाशवाणी कैंटीन मध्ये जेवण आटोपले आणि नेहमी प्रमाणे मंत्रालयात कामासाठी निघालो. त्या दिवशी जेवण ज़रा जास्तच झाले होते, वर लस्सी घेतल्याने थोड़ा आळसही आला होता, संध्याकाळी गावी परतायचे होते, मंत्रालयात जावू का रूम वर जावून वामकुक्षी घ्यावी या विचारात असतानाच पाय नकळत मंत्रालयात कड़े वळले. नीघालोच आहोत आणि पुन्हा 8 दिवस येणे होणार नाही आजच कामे करून घेवूत  या विचाराने आत गेलो, जेवणा नंतरचा आळस जावा आणि शत पावली घडावी म्हणून लिफ्ट ने न जाता तड़क पाय-याने 6 वा मजला चालत चालता गाठला, तिथली थोड़ी फार कामे आटोपुन चौथ्या मजल्यावर आणि पुन्हा एक काम आठवले म्हणून पाचवा मजल्यावर गेलो. या मजल्यावर आमच्या जिल्ह्यातील एका मंत्र्याचे ऑफिस.  म्हणून हे ऑफिस हा ज़रा हक्काचे वाटायचे. आत गेलो आणि चव्हाण नावाच्या तेथील pa मित्राकडे बसलो. घड्याळाचा काटा तो पर्यंत 2.40 वर सरकला होता.

अचानक , चौथ्या मजल्यावर आग लागली अशी चर्चा सुरु झाली , शॉर्ट सर्किट झाले असेल असे समजुन त्याकडे दुर्लक्ष केले , पण काही क्षणात आम्ही बसलो तिथे थोडासा धुर येवू लागला .... धावपळ सुरु झाली...सुरक्षेचा उपाय म्हणून आत मधील कॅबिन मध्ये गेलो, तिथे ही धुर आमचा पाटलाग करीत आला, एका मिनिटांत ती खोली धुरांने भरून गेली, धावपळ, पळापळ,  आरडा - ओरड सुरु झाली,
नाकातोंडात धूर जाऊ लागल्याने ठसका येऊ लागला,डोळे चूरचूरायला लागले होते.बाहेर जाण्याशिवाय पर्याय नव्हता,बाहेर जाण्यासाठी कॅबीन चा दरवाजा उघडताच धुराचा प्रचंड मोठा लोट अंगावर आला,संपूर्ण पॅसेज काळ्याकुट्ट धूराने व्यापून गेला होता, दोन पावलांवरचे ही काही दिसत नव्हते, मंञालय तसेच पायाखालचे !!  डोळ्याला पट्टी बांधली तरी कुठूनही आणि कसेही जाता येईल इतक्या ओळखीचे होते. त्यामुळे तसाच त्या अंधारातही भिंतीचा आसरा घेऊन डोळे घट्ट मिटून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला,  माञ अंधारात आपण चालू शकू पण नाकातोंडात जाणार्‍या धुरामुळे काही क्षणात बेशुद्ध होऊ याचीही जाणीव झाली. त्या क्षणाला  Sixth Sense जागा झाला आणि थांबलो! विचार केला  की ज्या खोलीत आपण थांबलो ती मंञालयाच्या आतील भागात उघडत होती तर अगदी चार पावलांवर त्याच्या समोरच्या बाजूला असलेली मंञ्यांची केबीन मंञालयाच्या बाहेर दर्शनीय भागात उघडणारी होती. त्यामुळे खाली न जाता समोरच्या केबीनमधे जाण्याचा निर्णय घेतला.एकमेंकाच्या हाताची साथ घेऊन समोरची केबीन गाठली. ते मंञ्यांचे दालन असल्याने हवाबंद आणि  थोडेसे सुरक्षीत असल्याने त्या कक्षात आणखी धूराचे लोट पोहचले नव्हते. त्यामूळे तिथे थोडासा धीर आला,हा थोडासा समाधानाचा क्षणही क्षणभरच टिकला, ती केबीन ही धूराने पाहता-पाहता गच्च भरली. 
फटाक्याची माळ पेटत-पेटत जावी त्याप्रमाणे रूममधील एक एक  वस्तू पेट घेत होती,खिडकीला लागून असलेल्या पाईपला धरून चौथ्या मजल्यावर जाणे शक्य होते.. सिंमेटचा पाईप तो बाहेरची गरमी आणि आगीच्या झळांमूळे तो ही तापला होता.एकीकडे पाईपला हात लावताच बसणारे चटके,खाली न जावे तर आतमधे उभा टाकलेले मरण आणि गरम पाईपला धरून खाली उतरताना तोल जाऊन पाचव्या मजल्यावरून खाली पडण्याची आणि पर्यायाने मरणाच्या च्या जवळ जाण्याचीच तिसरी शक्यता.. चोहूबाजूंनी मृत्यु  दिसत होता.कूठला तरी पर्याय निवडणे भाग होते. पाईपला धरून खाली उतरणे हा तसा थोडासा सोपा पर्याय निवडला,पाचव्या वरून चौथ्या मजल्यावर आलो.खिडकीच्या सज्जाचा भक्कम आधार मिळाला.एका छोट्याश्या सज्जावर 35-40 जणांची गर्दी, खाली बघ्यांची नुसतीच गर्दी आणी आरडाओरड . मदत करण्याची इच्छा असूनही ते सर्व हतबल होते.

दुसरीकडे समोर मृत्यु उभा असतानाही अंगातला पञकारीतेचा गुण जात नव्हता. मोबाईलद्वारे फोन करून काही वाहीन्यांच्या पञकार मिञांना घटनेची माहिती दिली.टिव्हीवर ब्रेंकींग न्यूज सुरू झाल्या.काही वाहीन्यांवर माझ्या नावाची पट्टी आणी मी अडकल्याची पट्टी झळकू लागली.आणि एका वाहिनीने तर चक्क फोनवरून लाईव्ह प्रतिक्रीया घेताना एकीकडे धीर देत त्याच्या स्टाईलमधे 'आता नेमकं तिथे कस वाटतंय ? काय अनुभवता आहात असे ? पराकोटीचे प्रश्न ही विचारले..
 पुढचा प्रसंग काय येणार हे माहीत नव्हते.घरी एकदा बोलून घ्यावे या विचाराने सौ. ला फोन केला तर त्या वामकुक्षीच्या अधीन गेलेल्या, बोलणे काही झालेच नाही. साडेतीन वर्षापूर्वीही सोशल मिडीयाचा तेवढाच नाद !! या जिवघेण्या प्रसंगातही मंञालयाला आग पाचव्या मजल्यावर अडकलो, felling घाबरलेला !!! अशी पोस्ट टाकून मोकळा झालो.. चौथ्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी आता पाईप ही नव्हता.खाली कसे जावे ? हा प्रश्न होता. पाठीमागे मंञालय धडधडा जळताना दिसत होते,तिथे कुठल्याही क्षणी खिडकीतून आग आमच्यापर्यंत पोहचणार होती.सर्वांनी आपले शर्ट काढून त्याची दोरी बनवून त्या द्वारे खाली उतरण्याचा विचार सुरू केला. या पर्यायातही  मृत्युचाच धोका होता. दरम्यानच्या काळात टिव्हीवरील बातमी आणी फेसबूकवरील स्टेटस पाहून मिञाचे,नातेवाईंकाचे आणि परिचितांचे फोन यायला सुरवात झाली. प्रतिक्रियेसाठी आता हिंदी,इंग्रजी वाहीन्यांचे फोन येणे सुरू झाले होते. एकीकडे जिव कसा वाचवावा हा प्रश्न ??  दूसरीकडे हा फोनचा वैताग !
खालून कूठलीही मदत येताना दिसत नसल्याने संयम सुटत चालला होता. सज्जावर सोबत असणा-या दोन तिन महीला कर्मचा-यांचे  वेळापासून रडणे सुरू झाले होते. गोंधळातून त्याचे रडणे कानावर पडले की आमच्याही जिवाची घालमेल सुरू व्हायची. दोन क्षणासाठी डोळे बंद केले आणी भिंतीच्या आधाराने डोके टेकवले तोच आणखी एक शाॅक बसला. एवढ्या गर्मीतही कपाळावर थंड थेंब पडत असल्याची जाणीव झाली आणि दोन सेंकदाची तंद्री ही हरवली. थेंब कोठून येत आहेत म्हणून वर पाहीले आणि इतका वेळ धीर धरून ठेवलेले हातपाय आता गळायला लागले होते. सहाव्या मजल्यावरील खिडकीतून खाली न येता आल्याने आणि धूराच्या ञास ने बेशुद्ध आणि  गतप्राण झालेल्या एका माणसाच्या तोंडातल्या  फेसाचे ते थंड थेंब होते. क्षणभर काहीच सुचले नाही. आता सर्व संपले याची खाञी पटू लागली.. गरम झालेल्या खिडकीचा सज्जाही कुठल्याही क्षणी आम्हाला घेऊन खाली कोसळणार होता. काय करावे सुचत नसतानाच पुन्हा एक अंधूक आशा दिसली. फायर ब्रिगेडचे लोक त्याच्यांकडील उंच शिडी घेऊन आमच्यापर्यंत पोहचत होते. थोडासा धीर आला.
 त्या शिडीने सज्जावर अडकलेली माणसे खाली घेऊन जाऊ लागली. एका वेळी त्या शिडीत चार लोक बसायचे, फायर ब्रिगेडच्या नियमाप्रमाणे सर्वात आधी लहान मुले-महीला नंतर वयोवृद्ध नागरिक आणि  सर्वात शेवटी आमच्या सारखी तरूण मंडळी असा क्रम ठरला होता. माझा नंबर जवळपास शेवटच्या फेरीतच आला. सज्जावरून शिडीत जाताना उडी मारावी लागायची ही उडी मारतानाही तोल जाऊन कोसळण्याची भिती म्हणजे आणखीही मृत्युचा  पाठलाग संपला नव्हता. अखेर जवळपास संपुष्ठात येवू लगलेला जिव तसाच मुठीत घेऊन देवाचे नाव घेत शिडीत उडी मारली आणी सुखरूप खाली पोहचलो.. .. खाली येताच पञकार मिञांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. कॅमेराचे फ्लॅश आणि  लखलखाट धूराने काळा झालेला चेहरा अधिकच गडद करून दाखवीत होता.गरम झालेले डोके शांत करण्यासाठी चार बाटल्या डोक्यावर ओतूनही ते शांत होत नव्हते. मिञाच्यां साहाय्याने तसाच अर्धा तास शांत बसून होतो. .. 58 मिनीटांचा मृत्यूचा अनुभवलेला थरार संपला होता..........पण त्या 58 मिनिटांची स्मृति कायमची राहिली होती.
( अडिच वर्षापूर्वी मंत्रालय आगीत अनुभवलेला सत्य प्रसंग ) 
या घटनेनंतर घरी परत जाताना एक विचार करू लागलो आपण दूपारी मंञालयात गेलो नसतो तर या प्रसंगातून वाचलो नसतो का ? हा विचार आला आणि मी कसा वाचलो याचाही विचार करू लागलो.. मि ज्या कामासाठी कंटाळा न करता मंञालयात गेलो त्या कामामध्ये दोन कामे ही गरीब कॅन्सर पिडीतांना मदत मिळवून देण्याची होती. ही कामे त्याच दिवशी माझ्या जाण्यामुळे मार्गी लागली होती. कदाचित त्या गरीब रूग्णांसाठी मी केलेली छोटीसी मदत त्याच्यां सदिच्छा यामुळेच मी यातून वाचू शकलो..

2 comments: