Saturday, April 23, 2016

भीषणता दुष्काळाची !

भीषणता दुष्काळाची ! ------------------------- मागील 2 दिवस दुष्काळग्रस्त मराठवाड्यात ( माझ्या साहेबासोबत ) फिरण्याचा योग आला. या 2 दिवसात 40 ते 44 डिग्री तापमानात सकाळी 7 ते रात्री 11 वाजे पर्यंत फिरलो , सूर्य आग ओकत होता, गाडीत जरी ac होता तरी प्रत्येक 2-4 किलोमीटर वर उतरून जनतेशी संवाद साधताना बसणारे उन्हाचे चटके ! खेड्या पाड्यात गाड्या जात नाहीत तिथे करावी लागणारी पायपीट , काट्या- कुट्याचे रस्ते ! निवा-याला कुठे जागा नाही , कि सावलीसाठी एखादे मोठे झाड नाही, वारे वाहायचे पण ते वारे नव्हते तर त्या होत्या उन्हाच्या झळा !!! लांबच्या लांब दिसायच्या त्या फक्त कोरड्या पडलेल्या काळ्या जमिनी !! ज्यांच्या भेगा पाहून त्यांची तहान जाणवायची ! पण आम्हाला होणा-या या त्रासापेक्षा मन जास्त सुन्न झाले ते दुष्काळ ग्रस्ताच्या व्यथा ऐकून ! औरंगाबाद, बीड, जालना, लातूर , उस्मानाबाद या 5 जिल्ह्यात असंख्य नागरिकांशी संवाद साधतांना त्यांच्या डोळ्यात दिसत होते ते फक्त आजचे दुःख, सहन कराव्या लागत असलेल्या वेदना आणि उद्याची चिंता ! महिलांना चिंता होती ती आज तरी टँकर येईल का आणि 2 हांडे मिळतील का याची ? मुलांना चिंता ती आमच्या बापाला या वर्षी तरी आमची फीस भरता येईल का आणि शिक्षण घेता येईल का याची ! शेतक-याला तर एक नाही तर 10 चिंता खात होत्या, बोलतांना परिस्थीतीमुळे त्यांचा आवाज खोल गेला होता, पिण्याचे पाणी आटले होते तसेच त्यांचे अश्रू हि संपले होते, कोरड्या मनाने ते व्यथा सांगत होते ! शेतात पिकल नाही, खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही ! शेतीवर कर्ज - बँक कधी जप्ती आणेल नेम नाही , जप्ती नाही आली तरी जून फिटलं नाही तर पुन्हा खरीपासाठी कर्ज मिळेल का ? कर्ज मिळाले तरी पुन्हा पाऊस येईल का आणि आमचे दारिद्र्य दूर होईल का ! पोराची फीस कशी भरू अन वयात आलेली पोर बिन लग्नाची घरात कशी ठेवू ! अर्धा जीव घरात अन अर्धा जीव पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या अन छावणीत असलेल्या जनावरात ! एक एक अनुभव एकूण मन सुन्न होत होत, या लोकांना धीर कसा द्यावा समजत नव्हत ! जिथे एक मिनिट उभे राहणे कठीण त्या 44 डिग्री उन्हात egs च्या कामावर दिवसभर काही हात राबत होते, गावच्या गावे ओस पडली होती अन आड, विहिरी , नद्या , नाल्या कोरड्या ! सरकारी मदत मिळते का ? या प्रश्नाला ते हो मिळते कि , दुबार पेरणीला 1500 आले अन नुकसान भरपाईचा 100 रु चा चेक ! असे उपहासात्मक उत्तर देत काही जण मोटारी बंद असताना आलेली लाईटची बिल हातावर आणून ठेवत होती ! एरवी गावात गेले की आपुलकीने पिण्याच्या पाण्याचा तांब्या हातात देणा-या गावक-यांची आपुलकीही या दुष्काळामुळे हिरावून घेतली होती . मन सुन्न झालं, पण एक गोष्ट समाधानाची वाटली, काही गावानी आपला संघर्ष सोडला नव्हता, घरातलं किडूक - मिडूक विकून लोक वर्गणी करून गावची नदी, नाले खोल करणे, गाळ काढणे , पाणी आडवन्यासाठी बंधारे बांधणे अशी चांगली कामे ते करत आहेत, पावसाची त्यांना आशा आहे, हे ही दिवस जातील हा विश्वास आहे ! संकटाचे ते संधीत ते रुपांतर करत आहेत ! पाण्याचे महत्व त्यांना पटले आहे, तसेच तुम्हा , मला शहरात राहणा-या लोकांना समजो आणि परमेश्वराने यावर्षी भरपूर पाऊस पाडावा अशीच मी या दोन दिवसात प्रार्थना करीत होतो. प्रशांत जोशी दि. 23 /4/2016




No comments:

Post a Comment