Sunday, August 12, 2018

#लग्नातील_गमती_जमती

माझ्याच लग्नातील गोष्ट , 2 दिवस सोहळा अतिशय हसत, खेळत ,उत्साहात आणि आणि आनंदात सुरू होता....निरोपाची वेळ झाली...सगळे पाहुणे गाडित बसायच्या तयारीत...अचानक माईकवर लेक चालली सासराला गाणे लागले, सगळा मुड बदलला ...ती ( म्हणजे आमची बायको Vaibhavi ) पाहुण्यांचा निरोप घेत रडायला लागली...माहेरची सर्वच मंडळी इमोशनल झाली ...आता दुसरे गाणे लागले ...बाबूल की दुवाये लेती जा... पुन्हा रडणा-यांची संख्या वाढली आणि वेगही... वैभवी तर एकायलाच तयार नाही... हळूच एका मुलाला कानात सांगीतले जा रे ती गाणी बंद कर... चमत्कार झाला ...गाणी बंद झाली तसा मुड बदलला... रडण्याची गती कमी झाली....वातावरण बदलू लागलं तसं नेमके बँड वाले तडमडले... पुन्हा तेच गाणे... बाबूल की दुवाये लेती जा.. लेक चाचली सासरला....आणि पुन्हा निरोप आणि रडायचा कार्यक्रम सुरू झाला... काही केल्या तिचे  पाऊल पुढे पडेना... गाडयात  बसलेली व-हाडी मंडळी कंटाळली...मी ही वाट पाहून रडवेला झालो....दोघेही गाडीत बसलेलो तरी गाडी पुढे निघेना.... डोक्यात एक आयडिया आली.. समोर तिची एक मस्तीखोर मैत्रीण उभी होती... तीची आणि माझी ट्युनिंग चांगली जमायची... आँखो ही आँखो मे बात हो गयी... न बोलता काय करायचे समजले.... ती गाडी जवळ आली....वैभवी एक मिनिटं खाली ये म्हणून तिला गाडीखाली उतरावयाला लावले... काय होत आहे हे कोणालाच समजले नाही.....वैभवी उतरली...तशी ती गाडीत माझ्या बाजुला येऊन बसली अन म्हणाली... वैभवी तू बस इथेच रडत...मीच जाते भाऊजी सोबत.... चलो हो भाऊजी म्हणाली... अन ड्राइवर ने स्लेफ मारताच वातावरण बदलले... इतका वेळ रडून रडून लाल झालेले डोळे पुसत वैभवी मैत्रिणीवर चक्क ओरडली...ये शहाणे चल उत्तर खाली...सगळेच पाहुणे आता मोठं मोठयाने हसायला लागले... ती मैत्रीण खाली उतरली आणि आता मैत्रिणी मैत्रिणीची गळाभेट होऊन रडा पडी सुरू झाली तसे मी म्हणालो.... असं करू या तुम्ही दोघीही चला... अन गाडीत रडत बसा म्हणे... तसे पुन्हा सर्व पाहुणे हसायला लागली...अन हसत हसत आम्हाला निरोप दिला....

#दिलवाले_दुलनिया_ले_गये

#लग्नातील_गमती_जमती
#भाग_2
#हो_हो_नाही_चल_फूटा
ही गंमत जमत लग्नातली नाही तर थोडी लग्नाच्या आधीची आहे. पण लग्नाचीच आहे. मी सुहास, समीर , वैभव हे आपल्या ग्रुपचे सदस्य आम्ही एकाच वयाचे, एकाच गावातील अन एकाच वर्गातील...14 वर्षांपूर्वी आम्ही सगळे एकाच #लग्नाळू_गँग चे सदस्य....सर्वांचे वधू संशोधन एकाच काळात सुरू होते... कोणाचे आधी होते यात आमची स्पर्धा लागलेली.... कोणालाही मुलगी पहायला जायचे असले की मित्र म्हणून सगळे सोबतच जायचो.... अनेकदा मला पाहायला गेलेली मुलगी सुहासला आवडायची तर कधी समीरला पाहायला गेलेली मुलगी मलाच आवडायची... आमच्याकडे एक तर आई वडील आधी मुलगी पाहून यायचे नंतर आम्ही जायचो किंवा आम्ही आधी जायचो नंतर घरची मंडळी मुलगी पहायला जायचे.… एक दिवस असेच मला मुलगी पाहायला मी व सुहास गेलेलो... दोघांनीही जीन्स, छान चेक्सचा शर्ट...गॉगल आणि  perfume मारून गेलेलो... घरात प्रवेश केला.... थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या... मुलगी पोह्याच्या प्लेट घेऊन आली.... तिच्या पाठीमागे तिची मैत्रीण ... दोघीही सुंदरच होत्या... पण मला तिची मैत्रिणीच जास्त आवडली.... पोहे संपले अन चहा आला...ती समोर खुर्चीव बसलेली....पाठीमागे तिची मैत्रीण उभी.... माझी नजर त्या मैत्रिणीवरच जास्त... बाजूला बसलेल्या सुहासच्या  कानात हळूच कुजबुजलो ... सुहास यार मायला मला त्या मुलीपेक्षा तिची मैत्रीणच खास वाटत आहे.... भिंतीला कान असतात हे माहीत होतं पण त्या घरात वा-यालाही कान होते का काय माहीत नाही...किंवा त्या मुलीचा sixth सेन्स तरी चांगला असावा...तिला आमचे बोलणे ऐकू तरी गेले असावे किंवा तिने अंदाज तरी  काढला असावा... माझे सुहासच्या कानातील बोलणे संपते ना संपते तोच ती मुलगी वीज चमकावी तशीच ताडकन उभी राहिली...अन आमच्यावर अक्षरशः तळपळीच... ओ मिस्टर.... तुम्हाला मी आवडले नाही काय ? मला पण तुम्ही नाही आवडलात...समजलं का ? आणि तुम्हाला जशी माझी मैत्रीण आवडली तसच मलाही तुमचा मित्र आवडू शकतो...
मला तर काय होतंय हे समजलंच नाही...सुहासचे मात्र तिच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष...मलाही तुमचा मित्र आवडू शकतो...हे वाक्य ऐकताच त्याच्या मनात लड्डू फुटला... त्या प्रसंगात ही एरवी लाजरा बुजरा असणारा सुहास मोठयाने ओरडला...हो , हो चालतय की... मला चालेल की.... तशी ती बिजली ची तार पुन्हा सुहासवर कडाडली... ओ मिस्टर ...काय ओ काय...काय चालतय तुम्हाला ... म्हणे मला चालेल...चला फुटा येथून....
कसाबसा राहिलेला चहा संपवून आम्ही त्या घरातून धूम ठोकली..ती यापुढे मुलगी पहायला जातांना मित्रांना सोबत घेऊन जायचेच नाही हा निश्चय करूनच....
#भाबड्याचे_भन्नाट_किस्से

Wednesday, December 21, 2016

अक्कलखाते

अक्कलखाते

निवडणुकीची गडबड सुरु होती, सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत काम , काम आणि काम ! एका - एका मतासाठी धावपळ सुरू होती, कारण निवडणूकच तशी प्रतिष्ठेची होती. संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत होता तसे  तसे काम वाढत होते. सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रचारात गुंतल्यामुळे कार्यालय व्यवस्थापन, मीडिया, प्रचार नियोजन यासह अनेक जबाबदा-या माझ्या लहान खांद्यावर पडल्या होत्या. असाच एक व्यस्त दिवस...2 अनोळखी गृहस्थ कार्यालयात येतात...शिपाई निरोप घेऊन येतो. हातावरची कामे संपेपर्यंत तसेच त्यांना बसवून ठेवत नंतर हं बोला काय तुमचे ? म्हणून त्यांना अखेर विचारले. आम्हाला साहेबांना भेटायचे आहे त्यांचे उत्तर.. कोठून आलात या प्रश्नाला पुणे हे उत्तर येताच साहेब प्रचारात आहेत, निवडणूक संपल्यावर 28 तारखेला या म्हणून चक्क कटवण्याचे उत्तर दिले. पुणेकर माणसे ती तितकीच चिवट...अहो आमचे खूप महत्वाचे काम आहे या त्यांच्या विनंतीला ही साहेबांना वेळ नाही काय आहे ते मला सांगा म्हणत मी माझ्या कामात गुंतलो. मी दाद देत नाही हे पाहून ते कधी निघून गेली ते समजले नाही. पण आधी सांगितल्या प्रमाणे त्या चिवट माणसांनी माझ्या नकळत दुस-या दिवशी माझा डोळा चुकवून साहेब यांची भेट घेतली अन मला साहेबांचा फोन आला, प्रशांत पुण्याच्या त्या दोघांचे काय ते पहा इतकाच निरोप आला. मी हो सर सर म्हणत काल ज्या लोकांना अक्षरश: कटवले होते त्यांना आता शोधू लागलो होतो.  11 वाजताच ते दोघेही पुन्हा माझ्या समोर दत्त म्हणून उभे. आज साहेबांच्या फोनमुळे कालच्या पेक्षा माझा सूर बदलला होता, मी त्यांना चहा मागवून बोला म्हणून वीचारु लागलो. ते सांगू लागले, आमच्या कडे एक प्लॅन आहे, आम्ही एक सर्वे करणार  आहोत, त्या सूचनेप्रमाणे तुम्ही काम केले तर तुम्हाला 11  हजार 648 मते  नक्की मिळतील हि खात्री आहे. एका एका मतासाठी दारोदार फिरणा-यासाठी एक गठा सुमारे 12 हजार मते म्हणजे तर बंपर लॉटरीच की ! मी आता चहा सोबत बिस्कीट हि मागवली. मी विचारले तुम्ही आमच्या साठी हे का करताय ? तुम्हाला त्या बदल्यात काय हवंय ? यावर त्यांनी आमच्याच पक्षाच्या नेत्यांच्या काही ओळखी सांगितल्या, संदर्भ दिले आम्ही पण पक्षासाठी पडद्यामागून काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत हे सांगितले. हे एकूण आता माझा त्यांच्यावरचा विश्वास वाढू लागला होता, मी ठीक आहे करा तुम्ही काम , काय लागले तर सांगा असे सांगून निरोप दिला. 12 हजार मतांची लिंक सापडणार म्हणून मी मनोमन सुखावलो होतो, त्यांची आता वाट पाहू लागलो होतो. चार दिवसानंतर ते दोघे पुन्हा आले. आता मी यावेळी त्यांना नास्ता मागवला होता. त्यांच्या हातातील 12 हजार मतांचे पाकीट मला आता खुणावू लागले होते. मी त्यांना तो रिपोर्ट मागताच ते म्हणाले साहेब थांबा, आमचे एक काम करा असे सांगीतले. मी काय विचारताच आमची एक संस्था आहे त्याचे member व्हा इतकी मागणी केली. मी लगेच तयार झालो ... मेंबर फीस म्हणून 17480 रु मागितले. मला 17480 रु का असा प्रश्न पडला तर त्यांनी कसले तरी गणित केले आणि शुभ अंक कसा आहे हे माझ्या गळी उतरवले. आता माझा पक्का विश्वास बसला अन मी नव्या 2 हजारच्या 8 आणि बाकी 100 च्या सहजा सहजी न मिळणा-या नोटा त्यांच्या हातात दिल्या. त्यांनी त्यांच्या जवळचे पाकीट माझ्या हातात दिले आणि शुभेच्छा देऊन निरोप घेतला. ते जाताच मी अधाशासारखा त्या पाकिटावर तुटून पडलो ते उघडून पाहिले अन त्यातील एका कागदावर लिहिलेल्या दोन ओळी वाचुन डोक्यावर हात मारुन घेत, सोफ्यावर धपकन खाली बसलो. त्या पाकिटात लिहिले होते, तुमच्या गावातील 12 हजार बाहेरगावी आहेत, मतदानाच्या दिवशी त्यांना घेऊन या , हि मते तुम्हाला नक्की मिळतील. या 2 ओळी होत्या. यात नविन काही नवीन असं काही नव्हतो. प्रत्येक निवडणुकीत बाहेर गावचे मतदार आणले जातात. त्या मुळे आपण फसवले गेलो हे लक्षात आले. रात्री साहेबांना हा किस्सा सांगीतला, त्यांनी काही न बोलता डोळ्यांनीच जे बोलायचे ते सूचित केले. पुन्हा मी  साहेब यांना एक प्रश्न विचारला , साहेब हे 17480 रु. कोणत्या खर्च खात्यात टाकू ?  साहेब म्हणाले तुमच्या #अक्कलखात्यात टाका ! 

दुस-या दिवशी माझ्या सारखेच निवडणुकीत व्यस्त असलेल्या रोहित, संतोष ला फोन करुन  सावध राहा रे , लोक अशा प्रकारे फसवत आहेत म्हणून सांगितले तर दोघांचे एकच उत्तर आले, अरे प्रशांत तुझे #अक्कलखाते काल उघडले का ? आमचे तर मागच्याच आठवड्यात सुरु झाले आहे.

©प्रशांत जोशी


आठवणी नागपूरच्या

#आठवणी_नागपूरच्या .....

नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपवून काल 16 दिवसानंतर गावी म्हणजे परळीला परतलो.... 36 तास उलटले, तरीही मन नागपूरच्या आठवणीतच आहे... अन जिभेवर सावजीची चव रेंगाळते आहे..... 7 वर्षांपासून दरवर्षी नागपूरला जातोय..परळीनंतर सगळ्यात जास्त आवडलेलं शहर कोणतं असेल तर ते म्हणजे नागपूर.... इथले लोक खऱ्या अर्थाने आयुष्य जगतायत..... इथली खाद्यसंस्कृती तर लाजवाब.....सावजी, वांग्याचं भरीत, पाटोड्यांची भाजी, संत्री अन त्याच जूस, संत्रा बर्फी..... गोळाभात आणि विशेष म्हणजे खव्याच्या पोळीसारखी गोड माणसं....
 नागपूरची गुलाबी थंडी, स्वच्छता, भव्य रस्ते, 
ट्रॅफिकची नसेलली दगदग, आणि निवांतपणा हे हि काही वैशिष्ठे...  नागपूरचे मित्र अन मैत्रिणी तर लय भारी 😝😝😝😝.....सकाळी गुलाबी थंडीत morning वॉक, त्या नंतर आयुर्वेदीक काढा, फ्रुट juice चा आस्वाद, सकाळी मस्त नास्ता, दिवसभर भृरकाम आणि रात्री सावजी with जाम🍻 .... असा माझा दिनक्रम....मजा आ गया.....

मॉर्निंग walk ला मोठे इथे एक मोठे वन उद्यान आहे, या ठिकाणी रोज 10 एक हजार लोक येत असतील. इथे रोज कोणाचा ना कोणाचा birthday  साजरा केला जातो, आपल्याच मित्राचा bday आहे असं समजून घुसायच, भरपेट नास्ता करायचा अन निघताना शुभेच्छा एक सेल्फी काढून त्याला खुश करायचं असा हि नित्य क्रम होता....एक दिवस wine महोत्सव...एक दिवस movie ...कधी व-हाडी थाट तर कधीएखादा बार....कधी राहुल देशपांडेंची मैफिल तर कधी वसंतराव देशपांडे सभागृहातील सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी....रात्री उशिरा पर्यंत शेकोटी समोरची अंताक्षरी..... असं रोज काही तरी नवं नवीन असायचं....नागपूर मध्ये तस पाहण्यासाठी , फिरण्यासाठी काही खास नाही...तरीही नागपूर खास आहे....झपाट्याने बदलत आहे...म्हणूनच नागपूर खास आहे....

पुढचे वर्ष भर  हे सगळं मिस करणार....!!!
        आता  पुन्हा रोजची  दगदग..कल्पनेनेच पोटात गोळा आलाय...☺ मनात आठवणी मात्र वर्षभर पुरतील इतक्या आहेत


Monday, November 21, 2016

मी आणि माझी टि.व्ही पत्रकारिता--Tv पत्रकार ते pro

प्रस्तावना ......

              मुंबईतील tv ( इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांचा दरवर्षी न्यूज रूम लाईव्ह हा दिवाळी अंक प्रसिद्ध होतो. मागील 7 वर्षांपासून मुंबईत काम करीत असल्याने या पत्रकारांशी चांगलाच स्नेह जुळला आहे, मैत्री झाली आहे. मी सुरुवातीच्या काळात tv पत्रकारिता केलेली असल्याने आणि आता pro म्हणून याच माध्यमांशी निगडित असल्याने माझा tv पत्रकार ते pro असा प्रवास असे लिखाण करावे असा आग्रह काही मित्रांनी केला. त्यावरून लिहिलेला हा छोटेसे प्रवास .......
              काल या अंकाचे मुंबईत प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले , निवडणुकीच्या प्रचारात असल्याने या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहता आले नाही  ही रुखरुख मात्र राहिली...

▶ सन 1995 सालची गोष्ट असेल...नुकताच बारावी पास होऊन बाहेर पडलेलो...इंजिनिअरींगला प्रवेश मिळवुनही घरच्या परिस्थितीमुळे अवघी चार हजार रूपये फिस भरणे ही शक्य नसल्याने मिळालेला प्रवेश रद्द झाला आणि शिक्षणाची नाळ तुटली ती कायमचीच...नावाला स्थानिक कॉलेजात बी.एस्सीला प्रवेश घेऊन काही तरी काम धंदा करायचा या उद्देशाने वयाच्या 19 व्या वर्षीच पत्रकारिता सुरू केली.
▶वडिलांचा पत्रकारितेचा वारसा असल्याने एका स्थानिक दैनिकात चारशे रूपये पगाराची उपसंपादक म्हणुन नौकरी मिळाली. दिवसभर शहरात फिरून बातम्या गोळा करायच्या आणि रात्रौ उशीरा एक-दोन वाजेपर्यंत पुर्ण अंकाची एक प्रत हातात पडे पर्यंत प्रुफ रिडींग, बातम्या लिहीणे, पाने लावणे ते संपादकिय लिहीण्या पर्यंतची सर्व कामे करावी लागायची. त्यावेळी शहरातच नाही तर जिल्ह्यातही ऑफसेट यंत्रणा आलेली नसल्याने हे दैनिक ट्रेडल मशिनवर खिळ्याची जुळवणी करून तयार व्हायचे. रात्री वर्तमान पत्राचे काम रेंगाळत गेले की रिकाम्या वेळात त्या खिळ्यांवर टाईमपास म्हणुन कंपोझींगही शिकलो. दिवसभर उन्हात फिरून आणि रात्री कंपोझींगच्या कामामुळे चेहर्‍या सोबत हातही काळे झालेले असायचे.
▶कालांतराने वर्ष सहा महिन्यातच ट्रेडल दैनिकाचे ऑफसेट दैनिकात रूपांतर झाले. ऑफसेट दैनिक हा नविन प्रकार, त्यात नव्याने सुरू केलेली पत्रकारिता यामुळे सातत्याने नव्याचा ध्यास असायचा...नव नविन कल्पना सुचायच्या आणि त्या दैनिकाच्या माध्यमातुन उत्साहाने राबवायच्या हा दिनक्रम असे...त्यावेळी दुरदर्शन वरील मराठी बातम्या आणि काही तुरळक ठिकाणी आज तक चॅनलच्या हिंदी बातम्या सोडता बातम्यांची चॅनल्स नव्हती. शहरातील दोनशे-चारशे ठिकाणी केबलद्वारे ही चॅनल्स दिसायची...त्यावेळी आमच्या दैनिकाची बॅनर लाईनही साडे सातच्या दुरदर्शनवरील मराठी बातम्या पाहुन ठरायची...दैनिक स्थानिक असले तरी संपादकांच्या आग्रहामुळे बॅनर लाईन मात्र पुणे-मुंबईपासुन ते अगदी अमेरिकेतल्या घटनेवरचीच असायची.
▶असाच एकदिवस बातम्या पाहताना डोक्यात कल्पना आली की आपल्याही अशा सिटी न्युज सुरू करता येतील का ? आणि त्या क्षणापासुन ध्यास लागता तो सिटी न्युज सुरू करण्याचा. बरीच विनवणी केल्यानंतर शहरातच्या सिटी न्युज चालकाने मी काही खर्च देणार नाही तुम्ही बातम्याची कॅसेट तयार करून द्यायची मी तीन वेळा ती दाखवील या अटीवर बातम्याला परवानगी दिली...त्यानंतरचा शोध म्हणजे कॅमेरामनचा. शहरातल्याच एका उत्साही आणि नव्यानेच व्यवसाय सुरू केलेला कॅमेरामन यासाठी तयार झाला तो या अटीवर की मला ऑर्डर असल्यानंतर तुमच्या बातम्या गोळा करण्यासाठी मी येणार नाही. पुढचा शोध होता तो मिक्सींग करणार्‍याचा आणि स्टुडिओसाठी जागेचा. आणखी एक शहरातचा लग्नाची व्हिडिओ कॅसेट मिक्स करून देणारा मित्र सहजासहजी तयार झाला मात्र स्टुडिओसाठी जागा शोधतांना घरातल्याच एका खोलीवर येऊन तो थांबला आणि आमचे परळी सिटी हे न्युज चॅनल सुरू झाले.
▶उत्साहाने हे सुरू तर केले मात्र वर्तमान पत्रातील नौकरी आणि या बातम्या हे सांभाळताना चांगलीच कसरत होऊ लागली. माझ्या पासुन ते कॅमेरामन पर्यंतचे सर्वच नविन त्यामुळे अनेक गोंधळ उडु लागले. मजेशिर प्रसंग घडु लागले. सुरूवातीस मी स्वतःच चार दिवस बातम्या देण्याचा प्रयत्न केला मात्र वाणीत असलेला दोष माझे मलाच लक्षात आल्याने निवेदक होण्याचे स्वप्न तेंव्हाच थांबले ते कायमचे...मग सुरू झाला शोध तो बातम्या देणार्‍या निवेदीेकेचा... शहरातील काही उत्साही महिला भगिणी तयार झाल्या मात्र त्या बातम्या देण्यासाठी हळदी-कुंकुवाला जाताना नटुन-थटुन जातात त्याप्रमाणे तयार होऊन यायच्या. एखादी निवेदीका बातम्या सांगताना जी खाली मान घालुन वाचायची ती मान संपुर्ण बातम्या संपल्यावरच वर व्हायची. दुसरी निवेदीका शाळेतल्या वकृत्व स्पर्धेत पाठ करून आलेल्या मुली ज्याप्रमाणे सुसाट वेगाने पाठ करून आलेले विसरायच्या आत आपले भाषण संपवायच्या त्याप्रमाणे बातम्या संपवायच्या.
▶दिवसभर फिरून बातम्या गोळा करतांना कधी सायकलीवर तर कधी कॅमेरामनसह तीघेजण एकाच बजाज कंपनीच्या 100 वेळा किक मारून सुरू होणार्‍या स्कुटरवरून शहराची रपेट व्हायची. कधी कॅमेरामन शुटतर करायचा मात्र ते रेकॉर्डच व्हायचे नाही. तर त्याला लग्नाची ऑर्डर आली की आमच्या बातम्या म्हणजे विदाउट फुटेज नुसतेच बातम्या वाचन. इथे ही दैनिकाप्रमाणे दुरदर्शनवरील सातची पहिली ठळक बातमीच आमच्या सिटी न्युजची मुख्य बातमी असायची.
▶सत्तर हजाराचे छोटेसे गांव त्यात अशा रोज कितीशा घटना घडणार ? म्हणुन मग बातम्यांमध्ये ब्रेक आणि त्या ब्रेकमध्ये जाहिराती सुरू करण्याची कल्पना सुचली. केवळ 50 रूपये घेऊन घरातल्या लहान मुलांचे वाढदिवस रेकॉर्ड करून ते बातम्यांमध्ये दाखवायचे तर कधी दोनशे रूपयात शाळेच्या गॅदरींगचा कार्यक्रम थोडक्यात दाखवायचा. दसरा, दिवाळी सारख्या सनाला शहरातच्या पुढार्‍यांच्या शंभर-दोनशे रूपयात शुभेच्छाही गोळा करून त्या माध्यमातुन थोडी कमाई होऊ लागली होती. अनुभवातुन सर्व स्थिरस्थावर होऊ लागले होते. एक चांगली निवेदीका मिळाली, मिक्सींगही व्यवस्थित जमु लागले आणि एकाच्या जागी दोन कॅमेरामनही तयार झाले. सिटी न्युज हा नविन प्रकार शहरात चर्चेचा विषय बनु लागला. टि.व्हीवर दिसणेच ही कल्पनाच सुखावह असल्याने जोरदार प्रतिसाद मिळु लागला, कार्यक्रमाला लोक आवर्जुन बोलावु लागले. पाहता पाहता शहरातील केबल कनेक्शनची संख्याही वाढु लागली. दैनिकाच्या संपादकांनीच त्याचा जोडुन या चॅनलची जबाबदारी घेत छानसा स्टुडिओ, पुर्ण वेळ शहरात फिरण्यासाठी पेट्रोलसह स्कुटर आणि बरेचसे स्वातंत्र दिले.
▶आमचा उत्साह आता द्विगुणीत झाला होता. युतीच्या कार्यकाळात गाजलेले गो.रा.खैरनार हे सभेसाठी परळी शहरात आले असतांना त्यांची घेतलेली मुलाखतही माझ्या आयुष्यातील पहिली मुलाखत ठरली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे ही एका लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान आले असता त्यांचीही मुलाखत घेण्याचे भाग्य लाभले. मुलाखत म्हणजे विदाउट बुम असायची. शहरातील नेतृत्व स्व.गोपीनाथरावजी मुंडे हे त्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री. त्यामुळे शहरात कार्यक्रमांची अक्षरशः रेलचेल...दिवसभर त्यांचे कार्यक्रम कव्हर करायचे आणि रात्री उशीरा मुलाखतीसाठी बारा-एक वाजेपर्यंत ताटकळत बसायचे. सर्व माणसे संपल्यानंतर ते बोलवायाचे मात्र त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वा समोर प्रश्‍न विचारण्या ऐवजी समोर उभा ठाकणे ही धाडसाचे व्हायचे. त्यामुळे स्वतःच ते त्यांना जे सांगायचे ते सांगायचे आणि आमचे काम हलके करायचे. शहरातल्या एका छोट्या न्युजला त्यांनी कधीच टाळले नाही हे ही न विसरता येण्या सारखे.
▶ 1997 साली परळीत झालेल्या साहित्य संमेलन कव्हर करतांनाही अनेक गमती-जमती घडल्या. नामवंत साहित्यीकाचे नाव ऐकलेले असायचे या मोठ्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला गेल्यानंतर त्यांना प्रश्‍न काय विचारावेत हे मात्र माहित नसायचे. अशा वेळी काही जन हसुन चार शब्द बोलायचे तर काही जन चक्क चला तुम्हाला विचारता येत नाही तर आलात कशाला म्हणुन हाकलुन द्यायचे. याच साहित्य संमेलना दरम्यान परळीत घडलेल्या रेल्वे अपघाताचे रात्री दोन वाजता जावुन केलेले कव्हर आणि सकाळी सातलाच दिलेल्या विशेष बातम्यांमुळे सिटीन्युजची लोकप्रियता प्रचंड वाढली. या अपघाताला भेट देण्यासाठी आलेल्या तत्कलीन रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांच्यासोबत संपुर्ण दिवस घालवला जाताना त्यांनी आमच्यातील उत्साह पाहुन पाठीवर थाप दिली. या सिटी न्युजच्या लोकप्रियतेमुळे आता केबल चालकाकडुन आम्हाला मानधन मिळु लागले होते.
▶ याच दरम्यान मी दैनिक देवगीरी तरूण भारतचा शहर प्रतिनिधी म्हणुन काम करू लागलो होतो. देवगीरी तरूण भारतचे पालक स्व.प्रमोदजी महाजन यांनी तरूण भारतच्या सर्व जिल्हा प्रतिनिधींची एक बैठक परळी शहरात घेतली. त्याबैठकीत त्यांनी पत्रकारितेवर अनमोल मार्गदर्शन केले. आगामी काळात इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे महत्व प्रचंड वाढणार आहे. त्यादृष्टीकोनातुन काय करता येईल ते पहा असा सल्ला दिला. आज इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे वाढलेले प्राबल्य पाहता त्यांची दुरदृष्टी किती होती हे लक्षात येते. मुलाखत घेताना पत्रकाराचा चेहरा कसा निर्विकार हवा आणि मुलाखत घेत असलेल्या व्यक्तीच्या कोणत्याही उत्तरामुळे चेहर्‍यावरचे भाव ढळु न देता आणि आपल्याला त्याच्याकडुन जे हवे आहे ते काढुन घेताना कुठेही आपल्या मनाचा थांगपत्ता लागु न देता मुलाखत घेतली पाहिजे हा धडा दिला.
▶ही सर्व घडी व्यवस्थित बसली असतांनाचा लग्नाचे वय होऊ लागल्याने लग्नाचे वेध लागु लागले मात्र पत्रकारांना कोणी सहसा मुली देत नाहीत या ग्रामीण भागातील अनुभवाचे चटके बसु लागले. त्यामुळे पत्रकारिता सोडुन लग्नासाठी मुंडे साहेबांच्या एका संस्थेत जनसंपर्क अधिकार्‍याची नौकरी धरावी लागली. आणि माझी पत्रकारिता संपली.
▶ त्याच काळात म्हणजे 2002 मध्ये राजकारणाची सुरूवात करणार्‍या आजचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे साहेबांशी संपर्क आला. सुरूवातीला त्यांच्या बातम्या देण्यापासुन ते पी.ए.आणि पी.आर.ओ कधी झालो हे समजलेच नाही. आज त्यांच्या सोबत काम करतांना दौर्‍याच्या आखणी पासुन अधिवेशन काळातील प्रश्‍नांपर्यंत सर्व कामे पहावी लागत असली तरी मन मात्र बातम्यांमध्ये अधिक गुंतलेले असते. एका चांगला पत्रकार एक चांगला पी.ए, पी.आर.ओ होऊ शकतो. सुरूवातीच्या काळात केलेल्या पत्रकारीतेचा फायदा आज त्यांच्यासोबत काम करतांना होतो. बातम्यांचे महत्व माहित असल्याने घटना घडण्याच्या आधीच बातमी देण्याची धडपड असते. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सोबतच फेसबुक, ट्विटर या नविन माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत, माध्यमांपर्यंत कसे पोहोचायचे याचे कसब अंगी आले आहे.
▶सोळा वर्षाचा धनंजय मुंडे साहेबांच्या सततच्या सहवासामुळे मने अशी जुळली आहेत की कोणती बातमी कशी द्यावी हे कधी ही विचारावे लागले नाही किंवा दिलेल्या बातमीत कधी चुक काढुन त्यांनी कधी रागावले ही नाही. कधी-कधी बातम्यांच्या अती घाईत एखादी चुक झाली तरी ते सहज समजुन घेतात. आज त्यांचा पी.ए, पी.आर.ओ स्थिरावलो असलो तरी मन मात्र आजही टि.व्ही पत्रकारीते मध्येच गुंतलेले असते. त्यामुळे मुंबईतील कमलेश सुतार असो की सागर, मंगेश, अमित, विलास हे पत्रकार मित्र असो त्यांच्याकडे पाहिले की मी स्वतःला त्यांच्यात पाहुन समाधान मानत असतो.

*प्रशांत जोशी*
Pa/ pro to lop धनंजय मुंडे



Friday, September 16, 2016

कुबेर गप्पा

#कुबेर_गप्पा – प्रशांत जोशी
नमस्कार मंडळी...
पुन्हा एकदा आपण हजर आहोत एका अशा कुबेराशी गप्पा मारण्यासाठी ज्याला अनेक जण वेगवेगळ्या कारणाने ओळखतात. त्यांची ओळख फक्त एकाच शब्दात करायची झाली तर ‘भाबडा’ हा एक शब्द देखील पुरेसा आहे. बरोबर... आपण आपण गप्पा मारणार आहोत भाबडे प्रश्न पडणारे प्रशांत जोशी यांच्याशी. चला तर मग त्यांनाच प्रश्न विचारून आपण भंडावून सोडू.
>>  नमस्कार सर...
प्रशांत सर :  नमस्कार...
>>  सर्वप्रथम कुबेरकरांशी गप्पा मारण्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद... गप्पांची सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न विचारणार आहे तो आहे राजकारणाबद्दल. तुम्ही नोकरीच्या निमित्ताने राजकारणाशी जोडलेले आहात. स्वतः राजकारणी नसले तरी तुमचा या गोष्टीशी खूप जवळचा संबंध आहे. पण सामान्य माणसाला मात्र त्यातील फारसे काहीच समजत नाही. तो राजकारणाबद्दल दोन अगदी विरुद्ध टोकाचे ग्रह बनवून घेतो. कारण त्याला राजकारण समजते ते एकतर चित्रपटातून किंवा टीव्हीवरील बातम्यांमधून. माझा प्रश्न असा आहे की चित्रपटात दाखविले जाणारे राजकारण आणि प्रत्यक्षातील राजकारण यात किती फरक असतो? तसेच स्विय सहाय्यक ( PA ) यांच्या कामाचे स्वरूप काय असते?
प्रशांत सर :  माध्यमांनी पोलिसांची जशी निगेटिव्ह प्रतिमा केली आहे, तशीच राजकारणी माणसाचीही केली आहे. जी पूर्णपणे नाही म्हणणार, पण 90 % चुकीची आहे. चित्रपटातील दाखवले जाणारे राजकारण आणि प्रत्यक्ष यात जमीन अस्मानचा फरक आहे. तुम्ही आम्ही नोकरशहा एकदाच परिक्षा पास होतो आणि आयुष्यभर निश्चित होतो. राजकारणी माणसाला मात्र दर पाच वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. आणि परीक्षक असतात 3 लाख मतदार. एकच सांगतो जे जवळून पाहिले म्हणून खात्रीने सांगू शकतो. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण... आणि... जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे..!!! बाकी PA बद्दल एका वाक्यात सांगायच तर PA हा नेत्यांची सावली असतो. त्यांचे कान आणि डोळे तोच असतो. नेत्याच्या सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी त्याने घ्यायची असते. चांगल्या PA मुळे नेत्याचा TRP वाढतो तसेच PA ने चुकीची कामे केल्यास त्याची फळे ही नेत्याला भोगावी लागतात. याचीही अनेक उदाहरणे या महाराष्ट्रात आहेत.
>>  क्या बात है सर... खरे तर राजकारण या विषयाबद्दल सामान्य माणूस खूपच अनभिज्ञ असतो. तुमच्यामुळे या गोष्टी समजल्या. आता पुढचा प्रश्न... मंत्रालयात काम करत असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांचेही काम अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्याबद्दलची एखादी आठवण सांगू शकाल?
प्रशांत सर :  आबा म्हणजे एक महान व्यक्तिमत्व ! त्यांच्या सहवासातील माझा एक अनुभव सांगतो!!! स्व.आर.आर.पाटील उर्फ आबा यांनी जिल्हा परिषद सदस्या पासुन ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक पदे भुषवली आहेत. पण सुरूवातीच्या काळात आबा हे  माझ्या सारखेच तासगावचे तत्कालीन नेते दिनकर आबा पाटील यांचे स्विय सहाय्यक होते. हा इतिहास फार कमी लोकांना माहित असेल. त्यामुळेच स्विय सहाय्यकांबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी मला एकदा त्यांच्या सहवासात जाणवली.  मा.धनंजय मुंडे साहेब यांच्या सोबत एक दिवस आबांच्या कार्यालयात असतांना त्यांच्या मुंबईतील स्विय सहाय्यकाने दिवाळीतील चार दिवसांचा दौरा अंतिम करण्यासाठी आबांना दाखवला. दिवाळीच्या या चार दिवसात सोबत पी.ए कोण राहणार असा प्रश्नस विचारला असता दौरा दाखवणार्याय मुंबईच्या कार्यालयीन पी.ए ने आपल्या गावाकडील पी.ए सोबत असतील असे सांगितले. यावर आबांनी अगदी त्याच्यावर थोडेसे रागात येत आमच्या गावाकडच्या सामान्य पी.ए यांना दिवाळी नाही का? वर्षभर ते कामात असतातच. त्यांना दिवाळी साजरी करू द्या  आणि मुंबईतील तुमच्या पैकी कोणी तरी एका पी.ए ने चार दिवस दौरा करून गावाकडचीही दिवाळी पहा असा आदेशच काढला. असा हा गावाकडच्या PA चीही आपुलकीने काळजी करणारा नेता!!!  आणखी एक - आपल्याकडे पोलिसांवर नेहमीच टीका होत असते. आज त्यांच्यावर होणा-या हल्ल्यांमुळे थोडी सहानभूती वाटत आहे. पण अधिवेशनात ज्या ज्या वेळी पोलिसांवर टीका व्हायची त्या प्रत्येक वेळेस आबा पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे.
>>  अफलातून... सामान्य माणसाला नेते आणि त्यांचे आयुष्य कसे असेल, त्यांचे वागणे कसे असेल याची माहिती नसते. प्रसारमाध्यमे ज्या गोष्टी बोलतात त्यानुसार त्या नेत्यांबद्दल माणसाचा एक नकारात्मक ग्रह होऊन बसतो. असे अनुभव एकंदरीतच राजकारणी माणसाच्या माणुसकीचे दर्शन घडवतात आणि आपण समजतो तसे राजकारण अगदीच वाईट नाहीये तर त्यातही अनेक सकारात्मक बाजू आहेत हे यावरून समजू शकते. राजकारणी नेत्यांची सकारात्मक बाजू देखील सामान्य माणसांसमोर यावी यासाठीच हा प्रश्न विचारला होता. असो. आता थोडेसे मागे जाऊ. चार वर्षांपूर्वी मंत्रालयाला आग लागली त्यावेळेस तुम्हीही तिथेच होतात. त्याबद्दल काही सांगू शकाल?
प्रशांत सर :  आयुष्यातला तो एक कधी न विसरता येणारा दिवस होता. 57 मिनीटाचा मृत्यूचा थरार जवळून अनुभवला. यावर मी ग्रुप मध्ये सविस्तर पोस्ट केली आहे, ती थोडक्यात मांडता येणार नाही म्हणून मी त्या पोस्टची मी माझ्या ब्लॉग वर लिहिलेली लिंक शेअर करतो. कोणाला वाचायचे असल्यास नक्की वाचा...
>>  खूपच थरारक अनुभव. आता जरा काहीसे हलके फुलके वातावरण करू. आजकाल तुम्हाला बरेच जण भाबडे जोशी म्हणूनही ओळखू लागले आहेत. त्याचे कारण म्हणजे तुम्हाला पडणारे भाबडे प्रश्न. मला सांगा... सगळ्यात पहिला भाबडा प्रश्न तुम्हाला कधी, कसा आणि कोणता पडला होता? तसेच तुम्ही एखादा भाबडा प्रश्न वहिनींना विचारला आणि त्याचे अगदी खरमरीत उत्तर आले असे कधी झाले आहे का?
प्रशांत सर :  तसा मी परळीचा, जन्मलो, वाढलो, घडलो, बिघड़लो परळीमधे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक परळीचे वैद्यनाथ. त्या भोळया शंकराचा ‘भाबड़े’पणा आपसुकच अंगात भिनला. या चालु जगात खूप हुशार राहून चालत नाही. म्हणून आपलं भाबड बनून राहायचं. हत्ती होऊन लाकड तोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणं कधी ही चांगल. मी अगदी लहान असल्यापासून असले भाबडे प्रश्न लोकांना विचारात आलो असल्यामुळे नेमका पहिला प्रश्न मात्र मला सांगता येणार नाही. बाकी तुमच्या उपप्रश्नाबद्दल बोलायचे झाले तर... घरी काही विचारायची सोय असते का हो? हाहाहा... पण खरं सांगू... माझ्या सारखीच वैभवी पण भोळ्या भाबड्या शंकराची भोळी भाबडी पार्वती आहे. ती जीवनात आली अन दिवस बदलत गेले. पाठीवर बि-हाड घेवुन वावरणारा पेशा, पण समर्थ पणे तिने संसार सांभाळला. मी अजूनही स्वतःला यशस्वी समजत नाही पण जेंव्हा केंव्हा होईल त्यामागे फक्त वैभवीच असेल..!
>>  वा... ग्रेट... हे मात्र खरं की माणसाच्या यशात त्याच्या जोडीदाराचा सिंहाचा वाटा असतो. पुढचा माझा भाबडा प्रश्न. तुम्ही मिश्किल आहात. रक्तदान करता हे काही पोस्ट वरून समजले, बसण्याच्या गोष्टीही नेहमी करता. त्यावरून पडलेला भाबडा प्रश्न असा की तुमच्या रक्तात नक्की काय जास्त आहे? मिश्किलकी? मदिरा? की राजकरण?
प्रशांत सर :  तिन्ही ही..! मिश्किल मी आहेच. राजकारणावर पोट भागत म्हणून ते नसा नसात भिनल आहे. आणि मदिरा म्हणाल तर त्याने नशा येते, अन मला नशा आहे ती कामाची, इतरांना मदत करायची.   
>>  वा... छानच... आता जाता जाता कुबेर बद्दल. कुबेर मधील अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला तितकीशी आवडत नाही?
प्रशांत सर :  अडमीनचा हंटर अन नारळ..! थोडा काय दंगा केला की हंटर दाखवतो. अर्थात हे गमतीने हं..!!! नाही तर नारळ डोक्यात पडायचं... आत्मस्तुती करणारे, स्वत:च्या मोठेपणाला कुरळणारे आवडत नाहीत... ते कुबेरवरच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही अशी लोक आवडत नाहीत. राजाचा रंक होताना खुप पाहतो आम्ही राजकारणात. तेंव्हा सगळ असतानाही जमिनीवर राहणारे भाबड़े लोक भावतात, मन तिथच जुळत... अशाच लोकांसोबत बसायला आवडत, बसल्यावर बिल त्यांनीच दिल तर आणखी प्रसन्न वाटत... हेहेहे... एकच सांगतो... चांगलं ते घ्यावं, वाईट ते गंगेत घ्यावं.... मी असेच चांगले मोती वेचतो.
>>  वा... अप्रतिम उत्तरे. खरे तर तुम्ही राजकारणात असल्यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा जरा जास्त प्रश्न विचारण्याचा माझा प्रयत्न होता. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगदी बिनधास्त दिलीत. पुन्हा एकदा कुबेरकरांशी मनमोकळा संवाद साधल्याबद्दल खूप खूप आभार.
तर मंडळी. हे होते आपले भाबडे जोशी. त्यांनी खूप छान आपल्याशी गप्पा मारल्या. आज आता वेळेअभावी इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूच आपण पुढील भागात, एका नवीन कुबेराशी गप्पा मारण्यासाठी. तो पर्यंत... नमस्कार...
मिलिंद जोशी, नाशिक...




Thursday, September 15, 2016

आज अभियंता दिन !!

आज अभियंता दिन !! 
...........
यानिमित्त माझ्या अभियंता ( इंजिनीअर ) होण्याच्या अधू-या  राहिलेल्या स्वप्नाची ही गोष्ट !!!
-----------------------------------------------
साल 1993 .....मी 10 वी ला सताना शाहरुख़ खानचा एक चित्रपट आला होता राजू बन गया जंटलमन ! मला शाहरुख़ खान हा लहानपणा पासून खुप आवडायचा , या चित्रपटात त्याने civil इंजीनियर चा रोल केला होता, झाले माझ्या मनात आपण ही इंजीनियरच व्हायचे हे फिक्स झाले, 
त्यासाठी 12 वी ला math ग्रुप घेतला , थोड़े बरे मार्क मिळाले , अंबाजोगाईच्या इंजीनियरिंग college ला 4000 रु फीस मध्ये शासकीय कोटयातुन इंस्ट्रूमेंटेंशन branch मिळाली , या branch चे महत्वही माहित नव्हते फ़क्त आपण इंजीनियर होत आहोत हा आनंद होता,  पण हा आनंद 6 महीने ही टिकला नाही , घरची आर्थिक परिस्थिति दीसायलाच बरी होती , सा-या कुटूम्बाचा भार त्यावेळी माझ्या पेक्षा फ़क्त 3 वर्षानी मोठ्या असलेल्या भावावर होता , त्याने 4000 रु तर दिले पण बाकी खर्चाचे काय ? अंबाजोगाई ला होस्टेल किंवा रूम करून परवडणारे नव्हते , म्हणून रोज जाणे करण्याचा निर्णय घेतला,  पण रोजच्या 10 रु तिकीटाचे ही वांदे होवू लागले, फ़क्त सहा महीने संघर्ष केला, रोज च्या आर्थिक ओढ़ात़ानीला कंटाळुन मी इंजीनियरिंग सोडून दिली. वर्ष वाया गेले , पुढे बी.एस.सी. ला प्रवेश घेतला पण शिक्षणाची नाळ तूटली ती कायमचीच. बीएससी ,बीजे ची डिग्री घेतली ती फ़क्त परीक्षेला जावूनच !
इंजिनियर डे आला की मी विचार करतो,इंजीनिअरिंग चे माझे स्वप्न अधूरे का राहिले ?परिस्थिती मुळे का माझ्या पळपुटेपणा मुळे ??
परवा सकाळ ला  जीवाची या परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणा-या अंध विद्यार्थ्याची बातमी वाकली आणि वाटले आपली परिस्थिती तर नक्कीच जीवा एवढी ख़राब नव्हती ?
आपण संघर्ष का केला नाही ! कदाचित हा संघर्ष करताना आपल्याला ही कोणीतरी जाधव सर ( जीवाला प्रोत्साहन देणारे सर)  भेटले आसते ...कोणी तरी उत्तम कांबळे यांनी लेख लिहून मदत मिळवून दिली असती पण त्या साठी मी जिद्द दाखवायला हवी होती. त्या वेळी कोणी कान पकडून असे करू नको, सोडू नको आसे सांगितले आसते तरी माझे स्वप्न पूर्ण झाले असते पण असे कोणी भेटलेच नाही. 
माझ्या सोबत  12 वी असणारी 90 % मुले आज इंजिनियर आहेत, ते भेटले की , मी अस्वस्थ होतो, इंजिनिअर होता आले नाही ही माझी ही अश्वथामा सारखी भळभळणारी जखम आहे, माझ्या पळपुटेपणाचा मलाच राग येतो  ! 🙏🙏🙏🙏🙏