Wednesday, December 21, 2016

अक्कलखाते

अक्कलखाते

निवडणुकीची गडबड सुरु होती, सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत काम , काम आणि काम ! एका - एका मतासाठी धावपळ सुरू होती, कारण निवडणूकच तशी प्रतिष्ठेची होती. संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत होता तसे  तसे काम वाढत होते. सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रचारात गुंतल्यामुळे कार्यालय व्यवस्थापन, मीडिया, प्रचार नियोजन यासह अनेक जबाबदा-या माझ्या लहान खांद्यावर पडल्या होत्या. असाच एक व्यस्त दिवस...2 अनोळखी गृहस्थ कार्यालयात येतात...शिपाई निरोप घेऊन येतो. हातावरची कामे संपेपर्यंत तसेच त्यांना बसवून ठेवत नंतर हं बोला काय तुमचे ? म्हणून त्यांना अखेर विचारले. आम्हाला साहेबांना भेटायचे आहे त्यांचे उत्तर.. कोठून आलात या प्रश्नाला पुणे हे उत्तर येताच साहेब प्रचारात आहेत, निवडणूक संपल्यावर 28 तारखेला या म्हणून चक्क कटवण्याचे उत्तर दिले. पुणेकर माणसे ती तितकीच चिवट...अहो आमचे खूप महत्वाचे काम आहे या त्यांच्या विनंतीला ही साहेबांना वेळ नाही काय आहे ते मला सांगा म्हणत मी माझ्या कामात गुंतलो. मी दाद देत नाही हे पाहून ते कधी निघून गेली ते समजले नाही. पण आधी सांगितल्या प्रमाणे त्या चिवट माणसांनी माझ्या नकळत दुस-या दिवशी माझा डोळा चुकवून साहेब यांची भेट घेतली अन मला साहेबांचा फोन आला, प्रशांत पुण्याच्या त्या दोघांचे काय ते पहा इतकाच निरोप आला. मी हो सर सर म्हणत काल ज्या लोकांना अक्षरश: कटवले होते त्यांना आता शोधू लागलो होतो.  11 वाजताच ते दोघेही पुन्हा माझ्या समोर दत्त म्हणून उभे. आज साहेबांच्या फोनमुळे कालच्या पेक्षा माझा सूर बदलला होता, मी त्यांना चहा मागवून बोला म्हणून वीचारु लागलो. ते सांगू लागले, आमच्या कडे एक प्लॅन आहे, आम्ही एक सर्वे करणार  आहोत, त्या सूचनेप्रमाणे तुम्ही काम केले तर तुम्हाला 11  हजार 648 मते  नक्की मिळतील हि खात्री आहे. एका एका मतासाठी दारोदार फिरणा-यासाठी एक गठा सुमारे 12 हजार मते म्हणजे तर बंपर लॉटरीच की ! मी आता चहा सोबत बिस्कीट हि मागवली. मी विचारले तुम्ही आमच्या साठी हे का करताय ? तुम्हाला त्या बदल्यात काय हवंय ? यावर त्यांनी आमच्याच पक्षाच्या नेत्यांच्या काही ओळखी सांगितल्या, संदर्भ दिले आम्ही पण पक्षासाठी पडद्यामागून काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत हे सांगितले. हे एकूण आता माझा त्यांच्यावरचा विश्वास वाढू लागला होता, मी ठीक आहे करा तुम्ही काम , काय लागले तर सांगा असे सांगून निरोप दिला. 12 हजार मतांची लिंक सापडणार म्हणून मी मनोमन सुखावलो होतो, त्यांची आता वाट पाहू लागलो होतो. चार दिवसानंतर ते दोघे पुन्हा आले. आता मी यावेळी त्यांना नास्ता मागवला होता. त्यांच्या हातातील 12 हजार मतांचे पाकीट मला आता खुणावू लागले होते. मी त्यांना तो रिपोर्ट मागताच ते म्हणाले साहेब थांबा, आमचे एक काम करा असे सांगीतले. मी काय विचारताच आमची एक संस्था आहे त्याचे member व्हा इतकी मागणी केली. मी लगेच तयार झालो ... मेंबर फीस म्हणून 17480 रु मागितले. मला 17480 रु का असा प्रश्न पडला तर त्यांनी कसले तरी गणित केले आणि शुभ अंक कसा आहे हे माझ्या गळी उतरवले. आता माझा पक्का विश्वास बसला अन मी नव्या 2 हजारच्या 8 आणि बाकी 100 च्या सहजा सहजी न मिळणा-या नोटा त्यांच्या हातात दिल्या. त्यांनी त्यांच्या जवळचे पाकीट माझ्या हातात दिले आणि शुभेच्छा देऊन निरोप घेतला. ते जाताच मी अधाशासारखा त्या पाकिटावर तुटून पडलो ते उघडून पाहिले अन त्यातील एका कागदावर लिहिलेल्या दोन ओळी वाचुन डोक्यावर हात मारुन घेत, सोफ्यावर धपकन खाली बसलो. त्या पाकिटात लिहिले होते, तुमच्या गावातील 12 हजार बाहेरगावी आहेत, मतदानाच्या दिवशी त्यांना घेऊन या , हि मते तुम्हाला नक्की मिळतील. या 2 ओळी होत्या. यात नविन काही नवीन असं काही नव्हतो. प्रत्येक निवडणुकीत बाहेर गावचे मतदार आणले जातात. त्या मुळे आपण फसवले गेलो हे लक्षात आले. रात्री साहेबांना हा किस्सा सांगीतला, त्यांनी काही न बोलता डोळ्यांनीच जे बोलायचे ते सूचित केले. पुन्हा मी  साहेब यांना एक प्रश्न विचारला , साहेब हे 17480 रु. कोणत्या खर्च खात्यात टाकू ?  साहेब म्हणाले तुमच्या #अक्कलखात्यात टाका ! 

दुस-या दिवशी माझ्या सारखेच निवडणुकीत व्यस्त असलेल्या रोहित, संतोष ला फोन करुन  सावध राहा रे , लोक अशा प्रकारे फसवत आहेत म्हणून सांगितले तर दोघांचे एकच उत्तर आले, अरे प्रशांत तुझे #अक्कलखाते काल उघडले का ? आमचे तर मागच्याच आठवड्यात सुरु झाले आहे.

©प्रशांत जोशी


आठवणी नागपूरच्या

#आठवणी_नागपूरच्या .....

नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपवून काल 16 दिवसानंतर गावी म्हणजे परळीला परतलो.... 36 तास उलटले, तरीही मन नागपूरच्या आठवणीतच आहे... अन जिभेवर सावजीची चव रेंगाळते आहे..... 7 वर्षांपासून दरवर्षी नागपूरला जातोय..परळीनंतर सगळ्यात जास्त आवडलेलं शहर कोणतं असेल तर ते म्हणजे नागपूर.... इथले लोक खऱ्या अर्थाने आयुष्य जगतायत..... इथली खाद्यसंस्कृती तर लाजवाब.....सावजी, वांग्याचं भरीत, पाटोड्यांची भाजी, संत्री अन त्याच जूस, संत्रा बर्फी..... गोळाभात आणि विशेष म्हणजे खव्याच्या पोळीसारखी गोड माणसं....
 नागपूरची गुलाबी थंडी, स्वच्छता, भव्य रस्ते, 
ट्रॅफिकची नसेलली दगदग, आणि निवांतपणा हे हि काही वैशिष्ठे...  नागपूरचे मित्र अन मैत्रिणी तर लय भारी 😝😝😝😝.....सकाळी गुलाबी थंडीत morning वॉक, त्या नंतर आयुर्वेदीक काढा, फ्रुट juice चा आस्वाद, सकाळी मस्त नास्ता, दिवसभर भृरकाम आणि रात्री सावजी with जाम🍻 .... असा माझा दिनक्रम....मजा आ गया.....

मॉर्निंग walk ला मोठे इथे एक मोठे वन उद्यान आहे, या ठिकाणी रोज 10 एक हजार लोक येत असतील. इथे रोज कोणाचा ना कोणाचा birthday  साजरा केला जातो, आपल्याच मित्राचा bday आहे असं समजून घुसायच, भरपेट नास्ता करायचा अन निघताना शुभेच्छा एक सेल्फी काढून त्याला खुश करायचं असा हि नित्य क्रम होता....एक दिवस wine महोत्सव...एक दिवस movie ...कधी व-हाडी थाट तर कधीएखादा बार....कधी राहुल देशपांडेंची मैफिल तर कधी वसंतराव देशपांडे सभागृहातील सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी....रात्री उशिरा पर्यंत शेकोटी समोरची अंताक्षरी..... असं रोज काही तरी नवं नवीन असायचं....नागपूर मध्ये तस पाहण्यासाठी , फिरण्यासाठी काही खास नाही...तरीही नागपूर खास आहे....झपाट्याने बदलत आहे...म्हणूनच नागपूर खास आहे....

पुढचे वर्ष भर  हे सगळं मिस करणार....!!!
        आता  पुन्हा रोजची  दगदग..कल्पनेनेच पोटात गोळा आलाय...☺ मनात आठवणी मात्र वर्षभर पुरतील इतक्या आहेत


Monday, November 21, 2016

मी आणि माझी टि.व्ही पत्रकारिता--Tv पत्रकार ते pro

प्रस्तावना ......

              मुंबईतील tv ( इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांचा दरवर्षी न्यूज रूम लाईव्ह हा दिवाळी अंक प्रसिद्ध होतो. मागील 7 वर्षांपासून मुंबईत काम करीत असल्याने या पत्रकारांशी चांगलाच स्नेह जुळला आहे, मैत्री झाली आहे. मी सुरुवातीच्या काळात tv पत्रकारिता केलेली असल्याने आणि आता pro म्हणून याच माध्यमांशी निगडित असल्याने माझा tv पत्रकार ते pro असा प्रवास असे लिखाण करावे असा आग्रह काही मित्रांनी केला. त्यावरून लिहिलेला हा छोटेसे प्रवास .......
              काल या अंकाचे मुंबईत प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले , निवडणुकीच्या प्रचारात असल्याने या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहता आले नाही  ही रुखरुख मात्र राहिली...

▶ सन 1995 सालची गोष्ट असेल...नुकताच बारावी पास होऊन बाहेर पडलेलो...इंजिनिअरींगला प्रवेश मिळवुनही घरच्या परिस्थितीमुळे अवघी चार हजार रूपये फिस भरणे ही शक्य नसल्याने मिळालेला प्रवेश रद्द झाला आणि शिक्षणाची नाळ तुटली ती कायमचीच...नावाला स्थानिक कॉलेजात बी.एस्सीला प्रवेश घेऊन काही तरी काम धंदा करायचा या उद्देशाने वयाच्या 19 व्या वर्षीच पत्रकारिता सुरू केली.
▶वडिलांचा पत्रकारितेचा वारसा असल्याने एका स्थानिक दैनिकात चारशे रूपये पगाराची उपसंपादक म्हणुन नौकरी मिळाली. दिवसभर शहरात फिरून बातम्या गोळा करायच्या आणि रात्रौ उशीरा एक-दोन वाजेपर्यंत पुर्ण अंकाची एक प्रत हातात पडे पर्यंत प्रुफ रिडींग, बातम्या लिहीणे, पाने लावणे ते संपादकिय लिहीण्या पर्यंतची सर्व कामे करावी लागायची. त्यावेळी शहरातच नाही तर जिल्ह्यातही ऑफसेट यंत्रणा आलेली नसल्याने हे दैनिक ट्रेडल मशिनवर खिळ्याची जुळवणी करून तयार व्हायचे. रात्री वर्तमान पत्राचे काम रेंगाळत गेले की रिकाम्या वेळात त्या खिळ्यांवर टाईमपास म्हणुन कंपोझींगही शिकलो. दिवसभर उन्हात फिरून आणि रात्री कंपोझींगच्या कामामुळे चेहर्‍या सोबत हातही काळे झालेले असायचे.
▶कालांतराने वर्ष सहा महिन्यातच ट्रेडल दैनिकाचे ऑफसेट दैनिकात रूपांतर झाले. ऑफसेट दैनिक हा नविन प्रकार, त्यात नव्याने सुरू केलेली पत्रकारिता यामुळे सातत्याने नव्याचा ध्यास असायचा...नव नविन कल्पना सुचायच्या आणि त्या दैनिकाच्या माध्यमातुन उत्साहाने राबवायच्या हा दिनक्रम असे...त्यावेळी दुरदर्शन वरील मराठी बातम्या आणि काही तुरळक ठिकाणी आज तक चॅनलच्या हिंदी बातम्या सोडता बातम्यांची चॅनल्स नव्हती. शहरातील दोनशे-चारशे ठिकाणी केबलद्वारे ही चॅनल्स दिसायची...त्यावेळी आमच्या दैनिकाची बॅनर लाईनही साडे सातच्या दुरदर्शनवरील मराठी बातम्या पाहुन ठरायची...दैनिक स्थानिक असले तरी संपादकांच्या आग्रहामुळे बॅनर लाईन मात्र पुणे-मुंबईपासुन ते अगदी अमेरिकेतल्या घटनेवरचीच असायची.
▶असाच एकदिवस बातम्या पाहताना डोक्यात कल्पना आली की आपल्याही अशा सिटी न्युज सुरू करता येतील का ? आणि त्या क्षणापासुन ध्यास लागता तो सिटी न्युज सुरू करण्याचा. बरीच विनवणी केल्यानंतर शहरातच्या सिटी न्युज चालकाने मी काही खर्च देणार नाही तुम्ही बातम्याची कॅसेट तयार करून द्यायची मी तीन वेळा ती दाखवील या अटीवर बातम्याला परवानगी दिली...त्यानंतरचा शोध म्हणजे कॅमेरामनचा. शहरातल्याच एका उत्साही आणि नव्यानेच व्यवसाय सुरू केलेला कॅमेरामन यासाठी तयार झाला तो या अटीवर की मला ऑर्डर असल्यानंतर तुमच्या बातम्या गोळा करण्यासाठी मी येणार नाही. पुढचा शोध होता तो मिक्सींग करणार्‍याचा आणि स्टुडिओसाठी जागेचा. आणखी एक शहरातचा लग्नाची व्हिडिओ कॅसेट मिक्स करून देणारा मित्र सहजासहजी तयार झाला मात्र स्टुडिओसाठी जागा शोधतांना घरातल्याच एका खोलीवर येऊन तो थांबला आणि आमचे परळी सिटी हे न्युज चॅनल सुरू झाले.
▶उत्साहाने हे सुरू तर केले मात्र वर्तमान पत्रातील नौकरी आणि या बातम्या हे सांभाळताना चांगलीच कसरत होऊ लागली. माझ्या पासुन ते कॅमेरामन पर्यंतचे सर्वच नविन त्यामुळे अनेक गोंधळ उडु लागले. मजेशिर प्रसंग घडु लागले. सुरूवातीस मी स्वतःच चार दिवस बातम्या देण्याचा प्रयत्न केला मात्र वाणीत असलेला दोष माझे मलाच लक्षात आल्याने निवेदक होण्याचे स्वप्न तेंव्हाच थांबले ते कायमचे...मग सुरू झाला शोध तो बातम्या देणार्‍या निवेदीेकेचा... शहरातील काही उत्साही महिला भगिणी तयार झाल्या मात्र त्या बातम्या देण्यासाठी हळदी-कुंकुवाला जाताना नटुन-थटुन जातात त्याप्रमाणे तयार होऊन यायच्या. एखादी निवेदीका बातम्या सांगताना जी खाली मान घालुन वाचायची ती मान संपुर्ण बातम्या संपल्यावरच वर व्हायची. दुसरी निवेदीका शाळेतल्या वकृत्व स्पर्धेत पाठ करून आलेल्या मुली ज्याप्रमाणे सुसाट वेगाने पाठ करून आलेले विसरायच्या आत आपले भाषण संपवायच्या त्याप्रमाणे बातम्या संपवायच्या.
▶दिवसभर फिरून बातम्या गोळा करतांना कधी सायकलीवर तर कधी कॅमेरामनसह तीघेजण एकाच बजाज कंपनीच्या 100 वेळा किक मारून सुरू होणार्‍या स्कुटरवरून शहराची रपेट व्हायची. कधी कॅमेरामन शुटतर करायचा मात्र ते रेकॉर्डच व्हायचे नाही. तर त्याला लग्नाची ऑर्डर आली की आमच्या बातम्या म्हणजे विदाउट फुटेज नुसतेच बातम्या वाचन. इथे ही दैनिकाप्रमाणे दुरदर्शनवरील सातची पहिली ठळक बातमीच आमच्या सिटी न्युजची मुख्य बातमी असायची.
▶सत्तर हजाराचे छोटेसे गांव त्यात अशा रोज कितीशा घटना घडणार ? म्हणुन मग बातम्यांमध्ये ब्रेक आणि त्या ब्रेकमध्ये जाहिराती सुरू करण्याची कल्पना सुचली. केवळ 50 रूपये घेऊन घरातल्या लहान मुलांचे वाढदिवस रेकॉर्ड करून ते बातम्यांमध्ये दाखवायचे तर कधी दोनशे रूपयात शाळेच्या गॅदरींगचा कार्यक्रम थोडक्यात दाखवायचा. दसरा, दिवाळी सारख्या सनाला शहरातच्या पुढार्‍यांच्या शंभर-दोनशे रूपयात शुभेच्छाही गोळा करून त्या माध्यमातुन थोडी कमाई होऊ लागली होती. अनुभवातुन सर्व स्थिरस्थावर होऊ लागले होते. एक चांगली निवेदीका मिळाली, मिक्सींगही व्यवस्थित जमु लागले आणि एकाच्या जागी दोन कॅमेरामनही तयार झाले. सिटी न्युज हा नविन प्रकार शहरात चर्चेचा विषय बनु लागला. टि.व्हीवर दिसणेच ही कल्पनाच सुखावह असल्याने जोरदार प्रतिसाद मिळु लागला, कार्यक्रमाला लोक आवर्जुन बोलावु लागले. पाहता पाहता शहरातील केबल कनेक्शनची संख्याही वाढु लागली. दैनिकाच्या संपादकांनीच त्याचा जोडुन या चॅनलची जबाबदारी घेत छानसा स्टुडिओ, पुर्ण वेळ शहरात फिरण्यासाठी पेट्रोलसह स्कुटर आणि बरेचसे स्वातंत्र दिले.
▶आमचा उत्साह आता द्विगुणीत झाला होता. युतीच्या कार्यकाळात गाजलेले गो.रा.खैरनार हे सभेसाठी परळी शहरात आले असतांना त्यांची घेतलेली मुलाखतही माझ्या आयुष्यातील पहिली मुलाखत ठरली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे ही एका लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान आले असता त्यांचीही मुलाखत घेण्याचे भाग्य लाभले. मुलाखत म्हणजे विदाउट बुम असायची. शहरातील नेतृत्व स्व.गोपीनाथरावजी मुंडे हे त्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री. त्यामुळे शहरात कार्यक्रमांची अक्षरशः रेलचेल...दिवसभर त्यांचे कार्यक्रम कव्हर करायचे आणि रात्री उशीरा मुलाखतीसाठी बारा-एक वाजेपर्यंत ताटकळत बसायचे. सर्व माणसे संपल्यानंतर ते बोलवायाचे मात्र त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वा समोर प्रश्‍न विचारण्या ऐवजी समोर उभा ठाकणे ही धाडसाचे व्हायचे. त्यामुळे स्वतःच ते त्यांना जे सांगायचे ते सांगायचे आणि आमचे काम हलके करायचे. शहरातल्या एका छोट्या न्युजला त्यांनी कधीच टाळले नाही हे ही न विसरता येण्या सारखे.
▶ 1997 साली परळीत झालेल्या साहित्य संमेलन कव्हर करतांनाही अनेक गमती-जमती घडल्या. नामवंत साहित्यीकाचे नाव ऐकलेले असायचे या मोठ्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला गेल्यानंतर त्यांना प्रश्‍न काय विचारावेत हे मात्र माहित नसायचे. अशा वेळी काही जन हसुन चार शब्द बोलायचे तर काही जन चक्क चला तुम्हाला विचारता येत नाही तर आलात कशाला म्हणुन हाकलुन द्यायचे. याच साहित्य संमेलना दरम्यान परळीत घडलेल्या रेल्वे अपघाताचे रात्री दोन वाजता जावुन केलेले कव्हर आणि सकाळी सातलाच दिलेल्या विशेष बातम्यांमुळे सिटीन्युजची लोकप्रियता प्रचंड वाढली. या अपघाताला भेट देण्यासाठी आलेल्या तत्कलीन रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांच्यासोबत संपुर्ण दिवस घालवला जाताना त्यांनी आमच्यातील उत्साह पाहुन पाठीवर थाप दिली. या सिटी न्युजच्या लोकप्रियतेमुळे आता केबल चालकाकडुन आम्हाला मानधन मिळु लागले होते.
▶ याच दरम्यान मी दैनिक देवगीरी तरूण भारतचा शहर प्रतिनिधी म्हणुन काम करू लागलो होतो. देवगीरी तरूण भारतचे पालक स्व.प्रमोदजी महाजन यांनी तरूण भारतच्या सर्व जिल्हा प्रतिनिधींची एक बैठक परळी शहरात घेतली. त्याबैठकीत त्यांनी पत्रकारितेवर अनमोल मार्गदर्शन केले. आगामी काळात इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे महत्व प्रचंड वाढणार आहे. त्यादृष्टीकोनातुन काय करता येईल ते पहा असा सल्ला दिला. आज इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे वाढलेले प्राबल्य पाहता त्यांची दुरदृष्टी किती होती हे लक्षात येते. मुलाखत घेताना पत्रकाराचा चेहरा कसा निर्विकार हवा आणि मुलाखत घेत असलेल्या व्यक्तीच्या कोणत्याही उत्तरामुळे चेहर्‍यावरचे भाव ढळु न देता आणि आपल्याला त्याच्याकडुन जे हवे आहे ते काढुन घेताना कुठेही आपल्या मनाचा थांगपत्ता लागु न देता मुलाखत घेतली पाहिजे हा धडा दिला.
▶ही सर्व घडी व्यवस्थित बसली असतांनाचा लग्नाचे वय होऊ लागल्याने लग्नाचे वेध लागु लागले मात्र पत्रकारांना कोणी सहसा मुली देत नाहीत या ग्रामीण भागातील अनुभवाचे चटके बसु लागले. त्यामुळे पत्रकारिता सोडुन लग्नासाठी मुंडे साहेबांच्या एका संस्थेत जनसंपर्क अधिकार्‍याची नौकरी धरावी लागली. आणि माझी पत्रकारिता संपली.
▶ त्याच काळात म्हणजे 2002 मध्ये राजकारणाची सुरूवात करणार्‍या आजचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे साहेबांशी संपर्क आला. सुरूवातीला त्यांच्या बातम्या देण्यापासुन ते पी.ए.आणि पी.आर.ओ कधी झालो हे समजलेच नाही. आज त्यांच्या सोबत काम करतांना दौर्‍याच्या आखणी पासुन अधिवेशन काळातील प्रश्‍नांपर्यंत सर्व कामे पहावी लागत असली तरी मन मात्र बातम्यांमध्ये अधिक गुंतलेले असते. एका चांगला पत्रकार एक चांगला पी.ए, पी.आर.ओ होऊ शकतो. सुरूवातीच्या काळात केलेल्या पत्रकारीतेचा फायदा आज त्यांच्यासोबत काम करतांना होतो. बातम्यांचे महत्व माहित असल्याने घटना घडण्याच्या आधीच बातमी देण्याची धडपड असते. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सोबतच फेसबुक, ट्विटर या नविन माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत, माध्यमांपर्यंत कसे पोहोचायचे याचे कसब अंगी आले आहे.
▶सोळा वर्षाचा धनंजय मुंडे साहेबांच्या सततच्या सहवासामुळे मने अशी जुळली आहेत की कोणती बातमी कशी द्यावी हे कधी ही विचारावे लागले नाही किंवा दिलेल्या बातमीत कधी चुक काढुन त्यांनी कधी रागावले ही नाही. कधी-कधी बातम्यांच्या अती घाईत एखादी चुक झाली तरी ते सहज समजुन घेतात. आज त्यांचा पी.ए, पी.आर.ओ स्थिरावलो असलो तरी मन मात्र आजही टि.व्ही पत्रकारीते मध्येच गुंतलेले असते. त्यामुळे मुंबईतील कमलेश सुतार असो की सागर, मंगेश, अमित, विलास हे पत्रकार मित्र असो त्यांच्याकडे पाहिले की मी स्वतःला त्यांच्यात पाहुन समाधान मानत असतो.

*प्रशांत जोशी*
Pa/ pro to lop धनंजय मुंडे



Friday, September 16, 2016

कुबेर गप्पा

#कुबेर_गप्पा – प्रशांत जोशी
नमस्कार मंडळी...
पुन्हा एकदा आपण हजर आहोत एका अशा कुबेराशी गप्पा मारण्यासाठी ज्याला अनेक जण वेगवेगळ्या कारणाने ओळखतात. त्यांची ओळख फक्त एकाच शब्दात करायची झाली तर ‘भाबडा’ हा एक शब्द देखील पुरेसा आहे. बरोबर... आपण आपण गप्पा मारणार आहोत भाबडे प्रश्न पडणारे प्रशांत जोशी यांच्याशी. चला तर मग त्यांनाच प्रश्न विचारून आपण भंडावून सोडू.
>>  नमस्कार सर...
प्रशांत सर :  नमस्कार...
>>  सर्वप्रथम कुबेरकरांशी गप्पा मारण्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद... गप्पांची सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न विचारणार आहे तो आहे राजकारणाबद्दल. तुम्ही नोकरीच्या निमित्ताने राजकारणाशी जोडलेले आहात. स्वतः राजकारणी नसले तरी तुमचा या गोष्टीशी खूप जवळचा संबंध आहे. पण सामान्य माणसाला मात्र त्यातील फारसे काहीच समजत नाही. तो राजकारणाबद्दल दोन अगदी विरुद्ध टोकाचे ग्रह बनवून घेतो. कारण त्याला राजकारण समजते ते एकतर चित्रपटातून किंवा टीव्हीवरील बातम्यांमधून. माझा प्रश्न असा आहे की चित्रपटात दाखविले जाणारे राजकारण आणि प्रत्यक्षातील राजकारण यात किती फरक असतो? तसेच स्विय सहाय्यक ( PA ) यांच्या कामाचे स्वरूप काय असते?
प्रशांत सर :  माध्यमांनी पोलिसांची जशी निगेटिव्ह प्रतिमा केली आहे, तशीच राजकारणी माणसाचीही केली आहे. जी पूर्णपणे नाही म्हणणार, पण 90 % चुकीची आहे. चित्रपटातील दाखवले जाणारे राजकारण आणि प्रत्यक्ष यात जमीन अस्मानचा फरक आहे. तुम्ही आम्ही नोकरशहा एकदाच परिक्षा पास होतो आणि आयुष्यभर निश्चित होतो. राजकारणी माणसाला मात्र दर पाच वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. आणि परीक्षक असतात 3 लाख मतदार. एकच सांगतो जे जवळून पाहिले म्हणून खात्रीने सांगू शकतो. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण... आणि... जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे..!!! बाकी PA बद्दल एका वाक्यात सांगायच तर PA हा नेत्यांची सावली असतो. त्यांचे कान आणि डोळे तोच असतो. नेत्याच्या सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी त्याने घ्यायची असते. चांगल्या PA मुळे नेत्याचा TRP वाढतो तसेच PA ने चुकीची कामे केल्यास त्याची फळे ही नेत्याला भोगावी लागतात. याचीही अनेक उदाहरणे या महाराष्ट्रात आहेत.
>>  क्या बात है सर... खरे तर राजकारण या विषयाबद्दल सामान्य माणूस खूपच अनभिज्ञ असतो. तुमच्यामुळे या गोष्टी समजल्या. आता पुढचा प्रश्न... मंत्रालयात काम करत असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांचेही काम अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्याबद्दलची एखादी आठवण सांगू शकाल?
प्रशांत सर :  आबा म्हणजे एक महान व्यक्तिमत्व ! त्यांच्या सहवासातील माझा एक अनुभव सांगतो!!! स्व.आर.आर.पाटील उर्फ आबा यांनी जिल्हा परिषद सदस्या पासुन ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक पदे भुषवली आहेत. पण सुरूवातीच्या काळात आबा हे  माझ्या सारखेच तासगावचे तत्कालीन नेते दिनकर आबा पाटील यांचे स्विय सहाय्यक होते. हा इतिहास फार कमी लोकांना माहित असेल. त्यामुळेच स्विय सहाय्यकांबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी मला एकदा त्यांच्या सहवासात जाणवली.  मा.धनंजय मुंडे साहेब यांच्या सोबत एक दिवस आबांच्या कार्यालयात असतांना त्यांच्या मुंबईतील स्विय सहाय्यकाने दिवाळीतील चार दिवसांचा दौरा अंतिम करण्यासाठी आबांना दाखवला. दिवाळीच्या या चार दिवसात सोबत पी.ए कोण राहणार असा प्रश्नस विचारला असता दौरा दाखवणार्याय मुंबईच्या कार्यालयीन पी.ए ने आपल्या गावाकडील पी.ए सोबत असतील असे सांगितले. यावर आबांनी अगदी त्याच्यावर थोडेसे रागात येत आमच्या गावाकडच्या सामान्य पी.ए यांना दिवाळी नाही का? वर्षभर ते कामात असतातच. त्यांना दिवाळी साजरी करू द्या  आणि मुंबईतील तुमच्या पैकी कोणी तरी एका पी.ए ने चार दिवस दौरा करून गावाकडचीही दिवाळी पहा असा आदेशच काढला. असा हा गावाकडच्या PA चीही आपुलकीने काळजी करणारा नेता!!!  आणखी एक - आपल्याकडे पोलिसांवर नेहमीच टीका होत असते. आज त्यांच्यावर होणा-या हल्ल्यांमुळे थोडी सहानभूती वाटत आहे. पण अधिवेशनात ज्या ज्या वेळी पोलिसांवर टीका व्हायची त्या प्रत्येक वेळेस आबा पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे.
>>  अफलातून... सामान्य माणसाला नेते आणि त्यांचे आयुष्य कसे असेल, त्यांचे वागणे कसे असेल याची माहिती नसते. प्रसारमाध्यमे ज्या गोष्टी बोलतात त्यानुसार त्या नेत्यांबद्दल माणसाचा एक नकारात्मक ग्रह होऊन बसतो. असे अनुभव एकंदरीतच राजकारणी माणसाच्या माणुसकीचे दर्शन घडवतात आणि आपण समजतो तसे राजकारण अगदीच वाईट नाहीये तर त्यातही अनेक सकारात्मक बाजू आहेत हे यावरून समजू शकते. राजकारणी नेत्यांची सकारात्मक बाजू देखील सामान्य माणसांसमोर यावी यासाठीच हा प्रश्न विचारला होता. असो. आता थोडेसे मागे जाऊ. चार वर्षांपूर्वी मंत्रालयाला आग लागली त्यावेळेस तुम्हीही तिथेच होतात. त्याबद्दल काही सांगू शकाल?
प्रशांत सर :  आयुष्यातला तो एक कधी न विसरता येणारा दिवस होता. 57 मिनीटाचा मृत्यूचा थरार जवळून अनुभवला. यावर मी ग्रुप मध्ये सविस्तर पोस्ट केली आहे, ती थोडक्यात मांडता येणार नाही म्हणून मी त्या पोस्टची मी माझ्या ब्लॉग वर लिहिलेली लिंक शेअर करतो. कोणाला वाचायचे असल्यास नक्की वाचा...
>>  खूपच थरारक अनुभव. आता जरा काहीसे हलके फुलके वातावरण करू. आजकाल तुम्हाला बरेच जण भाबडे जोशी म्हणूनही ओळखू लागले आहेत. त्याचे कारण म्हणजे तुम्हाला पडणारे भाबडे प्रश्न. मला सांगा... सगळ्यात पहिला भाबडा प्रश्न तुम्हाला कधी, कसा आणि कोणता पडला होता? तसेच तुम्ही एखादा भाबडा प्रश्न वहिनींना विचारला आणि त्याचे अगदी खरमरीत उत्तर आले असे कधी झाले आहे का?
प्रशांत सर :  तसा मी परळीचा, जन्मलो, वाढलो, घडलो, बिघड़लो परळीमधे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक परळीचे वैद्यनाथ. त्या भोळया शंकराचा ‘भाबड़े’पणा आपसुकच अंगात भिनला. या चालु जगात खूप हुशार राहून चालत नाही. म्हणून आपलं भाबड बनून राहायचं. हत्ती होऊन लाकड तोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणं कधी ही चांगल. मी अगदी लहान असल्यापासून असले भाबडे प्रश्न लोकांना विचारात आलो असल्यामुळे नेमका पहिला प्रश्न मात्र मला सांगता येणार नाही. बाकी तुमच्या उपप्रश्नाबद्दल बोलायचे झाले तर... घरी काही विचारायची सोय असते का हो? हाहाहा... पण खरं सांगू... माझ्या सारखीच वैभवी पण भोळ्या भाबड्या शंकराची भोळी भाबडी पार्वती आहे. ती जीवनात आली अन दिवस बदलत गेले. पाठीवर बि-हाड घेवुन वावरणारा पेशा, पण समर्थ पणे तिने संसार सांभाळला. मी अजूनही स्वतःला यशस्वी समजत नाही पण जेंव्हा केंव्हा होईल त्यामागे फक्त वैभवीच असेल..!
>>  वा... ग्रेट... हे मात्र खरं की माणसाच्या यशात त्याच्या जोडीदाराचा सिंहाचा वाटा असतो. पुढचा माझा भाबडा प्रश्न. तुम्ही मिश्किल आहात. रक्तदान करता हे काही पोस्ट वरून समजले, बसण्याच्या गोष्टीही नेहमी करता. त्यावरून पडलेला भाबडा प्रश्न असा की तुमच्या रक्तात नक्की काय जास्त आहे? मिश्किलकी? मदिरा? की राजकरण?
प्रशांत सर :  तिन्ही ही..! मिश्किल मी आहेच. राजकारणावर पोट भागत म्हणून ते नसा नसात भिनल आहे. आणि मदिरा म्हणाल तर त्याने नशा येते, अन मला नशा आहे ती कामाची, इतरांना मदत करायची.   
>>  वा... छानच... आता जाता जाता कुबेर बद्दल. कुबेर मधील अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला तितकीशी आवडत नाही?
प्रशांत सर :  अडमीनचा हंटर अन नारळ..! थोडा काय दंगा केला की हंटर दाखवतो. अर्थात हे गमतीने हं..!!! नाही तर नारळ डोक्यात पडायचं... आत्मस्तुती करणारे, स्वत:च्या मोठेपणाला कुरळणारे आवडत नाहीत... ते कुबेरवरच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही अशी लोक आवडत नाहीत. राजाचा रंक होताना खुप पाहतो आम्ही राजकारणात. तेंव्हा सगळ असतानाही जमिनीवर राहणारे भाबड़े लोक भावतात, मन तिथच जुळत... अशाच लोकांसोबत बसायला आवडत, बसल्यावर बिल त्यांनीच दिल तर आणखी प्रसन्न वाटत... हेहेहे... एकच सांगतो... चांगलं ते घ्यावं, वाईट ते गंगेत घ्यावं.... मी असेच चांगले मोती वेचतो.
>>  वा... अप्रतिम उत्तरे. खरे तर तुम्ही राजकारणात असल्यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा जरा जास्त प्रश्न विचारण्याचा माझा प्रयत्न होता. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगदी बिनधास्त दिलीत. पुन्हा एकदा कुबेरकरांशी मनमोकळा संवाद साधल्याबद्दल खूप खूप आभार.
तर मंडळी. हे होते आपले भाबडे जोशी. त्यांनी खूप छान आपल्याशी गप्पा मारल्या. आज आता वेळेअभावी इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूच आपण पुढील भागात, एका नवीन कुबेराशी गप्पा मारण्यासाठी. तो पर्यंत... नमस्कार...
मिलिंद जोशी, नाशिक...




Thursday, September 15, 2016

आज अभियंता दिन !!

आज अभियंता दिन !! 
...........
यानिमित्त माझ्या अभियंता ( इंजिनीअर ) होण्याच्या अधू-या  राहिलेल्या स्वप्नाची ही गोष्ट !!!
-----------------------------------------------
साल 1993 .....मी 10 वी ला सताना शाहरुख़ खानचा एक चित्रपट आला होता राजू बन गया जंटलमन ! मला शाहरुख़ खान हा लहानपणा पासून खुप आवडायचा , या चित्रपटात त्याने civil इंजीनियर चा रोल केला होता, झाले माझ्या मनात आपण ही इंजीनियरच व्हायचे हे फिक्स झाले, 
त्यासाठी 12 वी ला math ग्रुप घेतला , थोड़े बरे मार्क मिळाले , अंबाजोगाईच्या इंजीनियरिंग college ला 4000 रु फीस मध्ये शासकीय कोटयातुन इंस्ट्रूमेंटेंशन branch मिळाली , या branch चे महत्वही माहित नव्हते फ़क्त आपण इंजीनियर होत आहोत हा आनंद होता,  पण हा आनंद 6 महीने ही टिकला नाही , घरची आर्थिक परिस्थिति दीसायलाच बरी होती , सा-या कुटूम्बाचा भार त्यावेळी माझ्या पेक्षा फ़क्त 3 वर्षानी मोठ्या असलेल्या भावावर होता , त्याने 4000 रु तर दिले पण बाकी खर्चाचे काय ? अंबाजोगाई ला होस्टेल किंवा रूम करून परवडणारे नव्हते , म्हणून रोज जाणे करण्याचा निर्णय घेतला,  पण रोजच्या 10 रु तिकीटाचे ही वांदे होवू लागले, फ़क्त सहा महीने संघर्ष केला, रोज च्या आर्थिक ओढ़ात़ानीला कंटाळुन मी इंजीनियरिंग सोडून दिली. वर्ष वाया गेले , पुढे बी.एस.सी. ला प्रवेश घेतला पण शिक्षणाची नाळ तूटली ती कायमचीच. बीएससी ,बीजे ची डिग्री घेतली ती फ़क्त परीक्षेला जावूनच !
इंजिनियर डे आला की मी विचार करतो,इंजीनिअरिंग चे माझे स्वप्न अधूरे का राहिले ?परिस्थिती मुळे का माझ्या पळपुटेपणा मुळे ??
परवा सकाळ ला  जीवाची या परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणा-या अंध विद्यार्थ्याची बातमी वाकली आणि वाटले आपली परिस्थिती तर नक्कीच जीवा एवढी ख़राब नव्हती ?
आपण संघर्ष का केला नाही ! कदाचित हा संघर्ष करताना आपल्याला ही कोणीतरी जाधव सर ( जीवाला प्रोत्साहन देणारे सर)  भेटले आसते ...कोणी तरी उत्तम कांबळे यांनी लेख लिहून मदत मिळवून दिली असती पण त्या साठी मी जिद्द दाखवायला हवी होती. त्या वेळी कोणी कान पकडून असे करू नको, सोडू नको आसे सांगितले आसते तरी माझे स्वप्न पूर्ण झाले असते पण असे कोणी भेटलेच नाही. 
माझ्या सोबत  12 वी असणारी 90 % मुले आज इंजिनियर आहेत, ते भेटले की , मी अस्वस्थ होतो, इंजिनिअर होता आले नाही ही माझी ही अश्वथामा सारखी भळभळणारी जखम आहे, माझ्या पळपुटेपणाचा मलाच राग येतो  ! 🙏🙏🙏🙏🙏


Thursday, September 8, 2016

लाडक्या लेकीचा वाढदिवस

लाडक्या लेकीचा #वाढदिवस !!

#Dearश्रावणी .....8 सप्टेंबर 2004 ला तु इवलीशी चिमणी होऊन तु आमच्या घरात आलीस आणि माझं जीवनच बदललं त्याला आज 12 वर्ष पूर्ण झाली. किती भराभर सगळं बदलत... किती लवकर मोठी होत आहेत... वयानं आणि समजूतदार पणे. जन्मानंतर 4 महिने तुला हातात घ्यायची भीती वाटायची, एका हातावर झोपणारी तू, पायाचा झोका करुन खेळणारी तु आज माझिच आई सारखी माया , प्रेम आणि काळजी करतेस. 12 म्हणजे हे काही फार मोठे वय नाही पण तु तर लहान पणा पासून हे आता पर्यंत कधी हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हट्ट केलेला आठवत नाही की कधी रड़ा पड़ केलेले स्मरत नाही .....तरीही तुझ्याच किल बीलाने घर भरून जायचं....खेळण्यापेक्षा तु पुस्तकातच जास्त रमलीस.. दुस-या मुलांसारखं tv मध्ये गुंगु राहण्यापेक्षा जेंव्हा तु हातात पेन्सिल घेऊन drawing पेपर वर चित्र रेखाटण्यासाठी बसतेस तेंव्हा खूप सुखावतो मी....किती गुणी आणि समंजस आहेस तू....आज हे लिहीत असतांना तुझ्या जन्मापासून ते काल पर्यंतचे काही प्रसंग आठवले.... तुझ्या जन्माच्या वेळी हॉस्पिटल मध्ये जागून काढलेली ती रात्र आठवली. हल्ली कामामुळे तुला जास्त वेळ देता येत नाही तरीही तुझी आठवण रोज येते आणि आपल्यावर जीवापाड़ प्रेम करणारी ही लेक एक दिवस लग्नानंतर आपल्याला सोडून जाणार या साध्या कल्पनेनेच मला रडू येते. मागच्या वर्षी तुझ्या वाढ दिवसाला ही घरी थांबता आले नाही, तेंव्हा तुला फोन वर बोलताना विचारले होते बेटा तुला काय गिफ्ट आणु , तर तु बोलली पप्पा काही नको, तुम्ही काम संपवून या मग आपण celebrate करू, तुझे ते शब्द एकूण डोळ्यात पाणी आले.. म्हणूनच आज खास सुट्टी घेऊन तुझ्या सोबत थांबणार आहे.... मस्त दिवसभर तुझा बर्थडे साजरा करणार आहे....तुझ्या कडे पाहिले की खरोखर लक्षात येते की खरच मूली खुप ग्रेट असतात ..आणखी एक आठवण... मागच्या वर्षी तुझ्या वाढदिवसाला असंच काहीस लिहिलेले वाचून तु पोटाला बिलगली आणि रडतच म्हणाली होतीस पप्पा मी कुठे जाणार नाही हो तुम्हाला सोडुन पण असे काही लिहु नका कारण वाचून मला ही रडू येत आहे ... अगदी माझ्या सारखीच आहेस तु हळवी....तुझा बाप म्हणून तुझ्यासोबत वाढणं हे ही खूप आनंददायी आहे... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा.....तुझाच लाडकापप्पा — 



Friday, August 26, 2016

कुबेर ग्रेट भेट

फेसबुक वरच्या कुबेर नावाच्या एका ग्रुप मध्ये ओळख झालेल्या पण कधी भेट न झालेला जयेश नलावडे हा युवक परवा एका कामानिमित्त विधान भवनात आला, सहज त्याला त्याच्या कामात मदत केली..त्यावर त्याने फेसबुक ला पोस्ट करून आभार मानले. तशी मला स्व:कौतुकाची सवय नाही , कारण हे सर्व आपल्या मुळे नाही तर साहेबांमुळे घडते याची नेहमी कल्पना असते.....तरीही असे कोणी दोन शब्द बोलले कि कामाला नक्कीच हुरूप येतो , फेसबुकला या मित्राने केलेली ही पोस्ट*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
#कुबेर_भेट_ग्रेट_भेट*
भाबडा प्रश्न...... हे दोन शब्द वाचल्यावर प्रत्येक कुबेराच्या डोळ्यासमोर राहते ती एकच व्यक्ती.......ते म्हणजे प्रशांत जोशी सर. अशा या भाबडा प्रश्नकार प्रशांत सरांशी आज भेट झाली ती एका मोठ्या गहण प्रश्नात पडलेलो असताना.
आज मी माझ्या एका बहिणीच्या एम. फार्मच्या ॲडमिशनमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा केंद्रबिंदू असलेल्या ARC (Application Received Center) कडून झालेल्या चुकीवर उपाय शोधून काढण्यासाठी व अधिक माहिती घेण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनाय, मुंबई येथील कार्यालयात गेलो होतो. पण तेथील अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांची चूक नसतानाही तेच कसे चुकले हे सांगत काही मदत करण्यास तयार नव्हते. ARC च्या चुकीचे परिणाम एकूण तीन विद्यार्थ्यांना भोगायची वेळ आली होती.
तेव्हा त्या आॅफिसमधून बाहेर पडताना हा अन्याय विद्यार्थ्यांनी का सहन करायचा या विचाराने चिड आली होती. त्यात तेथील कर्मचारयांची भाषा ऐकूण अजूनच पारा चढला. या गोष्टीची कुठेतरी तक्रार झालीच पाहिजे असा विचार केला आणि काहीतरी मार्गदर्शन मिळेल या हेतूने प्रशांत जोशी सरांना फोन लावला.
प्रशांत सर विधानभवनातच आॅफिसमध्ये होते. त्यांनी मला आॅफिसलाच बोलावून घेतले. आॅफिसमध्ये पोहोचल्यावर सरांनी सर्वप्रथम तब्येतीची विचारपूस केली आणि त्यानंतर चहापाणी करून अडचण समजून घेतली. मूळ प्रश्न समजल्यावर सरांनी लगेच तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या सहाय्यकांना काॅल केला व ते स्वत: त्यांच्या आॅफिसमध्ये घेऊन गेले. वेळात वेळ काढून मदतीसाठी नेहमीच अग्रेसर अशा प्रशांतसरांबद्दल जे आजपर्यंत अनेक पोस्टमध्ये वाचलं होत ते प्रत्यक्षात अनुभवलं.
त्यानंतर तावडे साहेबांच्या सहाय्यकांनी लगेच तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांना काॅल करून प्रश्न सोडविण्याची विनंती केली. वरून दबाव आल्यानंतर ज्या कर्मचारयांनी सकाळी असहकाराची भूमिका घेतली होती त्यांनी संध्याकाळी लगेच त्यांच्या अधिकाराखाली ॲडमिशन कनफर्म करून देण्याचे मान्य केले.
काम झाल्यावर परत प्रशांत सरांनी मला धनंजय मुंडे साहेबांच्या बंगल्यावर बोलवून घेतले व मस्तपैकी पोहे खाऊ घातले. हेल्थ प्राॅब्लेममुळे बाहेरचे काही खाता येत नसल्यामुळे दिवसभर भुकेल्या पोटाला पोह्यांनी खूप मोठा आधार दिला. प्रशांत सर पोह्यांसाठी खरच मनापासून धन्यवाद नाहीतर घरी पोहोचेपर्यंत पार वाट लागली असती. पोहे खाऊन झाल्यावर एक सेल्फी घेऊन सरांचा निरोप घेतला. Abhijeet दा तू प्रशांत सरांच्या आजच्या रक्षाबंधनच्या पोस्टवरील कमेंटमध्ये म्हटलास त्याप्रमाणे सरांनी एका छोट्या गोड मुलीला खिशातून चाॅकलेट दिले आणि त्यातून खरंच प्रशांत सर त्यांच्या स्वभावाने चाॅकलेटसारखा गोडवा वाटत असतात हे जाणवले.
तेव्हा प्रशांत सरांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण त्यांच्या मदतीमुळेच आज तीन विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाचले. आणि अजून महत्त्वाचे म्हणजे त्यापैकी एक मुलगी ही GPAT Qualified आहे, ज्यामुळे तिला प्रति महिना १२००० Stipend मिळणार आहे. जर ॲडमिशन झाले नसते तर तिची सर्व मेहनत वाया गेली असती.
आजच्या अनुभवातून मला एक सांगावस वाटतं की आपण समूहातर्फे अनेकवेळा प्रत्यक्ष मदतीचे कार्य करतच असतो, पण आज या घटनेतून आपल्या समूहाने अप्रत्यक्षरित्या त्या तीन विद्यार्थ्यांची अत्यंत महत्त्त्वाची अशी  मदत केली आहे.
कारण आज कुबेरकर नसतो तर प्रशांत सर आणि मी अपरिचीत असतो. त्यामुळे कुबेर वृक्षाचे मूळ संतोष सरांचेही आभार.


Monday, August 22, 2016

सावली !!!

सावली !!!

राजकारण,समाजकारण ,कला, क्रीडा असो की साहित्य  या क्षेत्रातील दिगज्जांचे सामान्यांना नेहमीच आकर्षण असते, हे लोक राहतात कसे ? बोलतात कसे ? वागतात कसे या सा-यां बद्दल एक कुतुहूल असते, या लोकांना भेटावे, बोलावे असे नेहमी वाटत असते, त्यांचा सहवास लाभावा असे वाटत असते. असाच एका मोठ्या राजकारणी व्यक्तीचा सहवास लाभलेला मी एक भाग्यवंत ! हे व्यक्तिमत्व म्हणजे माझे साहेब...वयाने तरुण असले तरी कर्तृत्वाने लहान वयातच मोठे झालेले एक तडफदार नेतृत्व !!! 15 वर्षांपूर्वी नौकरीच्या निमित्ताने त्यांच्या जवळ आलो आणि बघता बघता त्यांची सावली बनून गेलो. आज त्यांच्याशी असलेले हे नाते साहेब आणि कर्मचारी असे नव्हे तर एका जेष्ठ बंधूप्रमाणे झाले आहे.  24 तास सोबत राहणारा एक pa म्हणून त्यांच्या प्रत्येक सुख, दुःखाचा सर्वात जवळचा एक साक्षीदार !  त्यांच्या सोबत काम करतांना अनेक गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या.  त्यांचा संघर्ष, त्यांचे नेतृत्व ,त्यांची सामान्यांच्या कामाप्रति असलेली तळमळ, जनतेशी असलेली आपुलकी, सहका-यांशी असलेला स्नेह, स्वभातील विनम्रता आणि सहनशीलता ! 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' याचा सर्वात मोठा अनुभव साहेबां सोबत काम करताना येतो, 'आम्हा घरी रोज नित्य युद्धाचा प्रसंग' या प्रमाणे रोज येणा-या नव नवीन प्रसंगांना ते धीराने तोंड देत असतात,सामान्यांसाठी झटत असतात ! म्हणूनच ते माझ्यासाठी आहेत आयडॉल ,आवडते हिरो अन एक आदर्श !! वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या लाडक्या नेत्याला खूप खूप शुभेच्छा !!!!💐💐💐🎂🎂🎂





Tuesday, June 14, 2016

आठवण शाळेतल्या पहिल्या दिवसाची....

*आठवण शाळेतल्या पहिल्या दिवसाची*


                   काल शाळेचा पहिला दिवस म्हणून श्रेयसला सोडण्यास गेलो. पहिलाच दिवस असल्याने शाळेच्या आवारात सर्वच मुलांचे पालक आपापल्या  मुलांना सोडण्यास आलेली , त्यांच्या 2 व्हिलर पासून ते मोठं मोठ्या गाड्यांची पार्किंग मध्ये हि गर्दी कि बस....काही पालक जोडीने आलेले....
                   सर्व मुले नीटनेटकी युनिफॉर्म मध्ये, पायात सॉक्स आज शूज, पाठीवर schoolbag चे ओझे, आत टिफीन अन पाण्याची waterbag.... प्रत्येक मुलगा असो वा मुलगी गोड, चुणचुणीत अन स्मार्ट ...प्रत्येकात त्या वयातही एक कॉन्फिडन्स... बिनधास्त पणे ती वावरत होती, बोलत होती... हिंदी , इंग्लिश मध्ये सफाईदार पणे बोलणा-या मूलांच्या या गप्पात विषय होते ..... कल कि इंडिया- झिमबॉम्बे match देखि क्या, तू कोनसे समर कॅम्प गया था, हम टूर पे गये थे, मैंने छुटीयो में ये गेम सिखा या नया ले लीया... सर्व चर्चा अशाच...._
                 त्यांच्याकडे पहात पहात मला शाळेतला दिवस डोळ्यासमोरून आठवू लागला..... घराच्या सर्वात जी जवळची शाळा असेल ती आमची शाळा असायची...मग ती जि. प.ची असो कि खाजगी.. शाळा जवळ म्हंटले कि कोणी सोडायला येणे अथवा स्कूल बॅग हा प्रकारच नाही. शाळेतला पहिला दिवस.... अर्धीच मुलं आलेली... शिक्षक हि मुलेच नाहीत म्हणून एकदा वर्गात चक्कर मारून बाकी सह शिक्षका सोबत गप्पात रंगलेली.... आहे तो ड्रेस घालून आलेली मुलं... कारण युनिफॉर्म फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारीच्या आसपास दिसायचा...अन इतर वेळी त्याची सक्तीही तशी नसायची... घर जवळ म्हणून टीफिनचा विषय नसायचा... मधली सुट्टी झाली घरी पळायचं.... स्कूल बॅग म्हणजे घरातली पिशवी... नाहीतर पावसात भिजू नये म्हणून carry बॅग ची केलेली स्कूल बॅग.... काहींच्या हातात तशीच मोकळी वह्या , पुस्तके !  काही अनवाणी पायांनी आलेली तर बहुतांश मुलांच्या पायात स्लीपर नाहीतर थोडी बरी चप्पल... शूज अभावानेच एखाद्याच्याच पायात  !!  पहिल्या दिवशी धडपड असायची ती जागा धरायची, कारण पुढे वर्षभर तीच जागा ठरलेली असायची !! पहिल्या दिवशी तर सोडा 8 दिवस पुस्तके अन वह्या नसायची!!! मागच्या वर्षीच्या को-या पानातून केलेली एक रफ वही !! मागच्या वर्षीची पुस्तके अर्ध्या किमतीत विकून स्वतः साठीही वरच्या वर्गातील कोणाची तरी अर्ध्या किमतीत घेतलेली पुस्तके... ज्याच्या कडे गाईड तो वर्गातला सर्वात श्रीमंत मुलगा.... शाळेतला हौद हीच वॉटरबॅग... पहिल्या दिवशी चर्चा असायची तू मामाच्या गावाला काय केलं.... मी किती कोया , गोट्या जमा केल्या न तू किती केल्या.... वर्गात आलेली नवीन मूल बुजून गेलेली तर जुनी मुलं टवाल्या करणारी ...
अस होत आमचं बालपण... असा असायचा आमचा शाळेतला पहिला दिवस...
© *प्रशांतजोशी*दि 12 जून 2016



Sunday, June 5, 2016

दहावीचा निकाल आणि आठवण.

दहावीचा निकाल आणि आठवण.....
उद्या सोमवारी दहावीचा निकाल. आमच्या वेळी दहावीच्या  निकालाची तारीख जाहीर झाल्यापासूनच निकालाच्या धास्तीने पोटात गोळा यायचा...कारण त्यावेळी आजच्या सारखा 85%, 90% , 95% निकाल नाही लागायचा तर 40 ते 65 % निकालाची परंपरा होती. दहावी म्हटले कि हमखास इंग्रजी आणि गणित या विषयात बहुतांश मुले नापास व्हायची, या नापासा पैकी फारच थोडी मुले शिकून पुढे जायची ! गल्लीतला एखादा मुलगा 40-45 % मार्क घेऊन पास झाला तरी हिरो ठरायचा ! आमच्या घरातल्या आमच्या 6 भाऊ- बहिणी पैकी माझ्या पेक्षा मोठी चौघे गणित आणि इंग्लिश या विषयात नापास झालेली. मी लहानपणा पासून तसा बरा हुशार असल्याने नापासाची भीती नव्हती, तरीही पोटात गोळा मात्र कायम होता, निकालाचा दिवस उजाडला अन मी 
75% मार्क घेऊन पास झालो. घरातच नाही नाही तर गल्लीतही इतके मार्क घेऊन पास होणारा मी पहिलाच ! वर्गातही तिसरा नंबर होता... आकाश ठेंगणे झाले होते. आजची मुले 95 , 96 आणि 99% मार्क घेतल्यावर ही नाराज झालेली जेंव्हा दिसतात तेंव्हा आपल्या त्या 75% मार्कांला किती किंमत होती असा प्रश्न पडतो. पण तो दहावीच्या निकालाचा थ्रिल मात्र काही वेगळाच !!

तुमच्या आहेत का अशा काही  दहावीच्या आठवणी ???


मंत्रालयातील आगीचा थरार

साधारण 3 वर्षापुर्वीची ही गोष्ट !!
 22 जून 2012 , वेळ दुपारी 2 च्या आसपासची . मुंबईतल्या आमदार निवासच्या आकाशवाणी कैंटीन मध्ये जेवण आटोपले आणि नेहमी प्रमाणे मंत्रालयात कामासाठी निघालो. त्या दिवशी जेवण ज़रा जास्तच झाले होते, वर लस्सी घेतल्याने थोड़ा आळसही आला होता, संध्याकाळी गावी परतायचे होते, मंत्रालयात जावू का रूम वर जावून वामकुक्षी घ्यावी या विचारात असतानाच पाय नकळत मंत्रालयात कड़े वळले. नीघालोच आहोत आणि पुन्हा 8 दिवस येणे होणार नाही आजच कामे करून घेवूत  या विचाराने आत गेलो, जेवणा नंतरचा आळस जावा आणि शत पावली घडावी म्हणून लिफ्ट ने न जाता तड़क पाय-याने 6 वा मजला चालत चालता गाठला, तिथली थोड़ी फार कामे आटोपुन चौथ्या मजल्यावर आणि पुन्हा एक काम आठवले म्हणून पाचवा मजल्यावर गेलो. या मजल्यावर आमच्या जिल्ह्यातील एका मंत्र्याचे ऑफिस.  म्हणून हे ऑफिस हा ज़रा हक्काचे वाटायचे. आत गेलो आणि चव्हाण नावाच्या तेथील pa मित्राकडे बसलो. घड्याळाचा काटा तो पर्यंत 2.40 वर सरकला होता.

अचानक , चौथ्या मजल्यावर आग लागली अशी चर्चा सुरु झाली , शॉर्ट सर्किट झाले असेल असे समजुन त्याकडे दुर्लक्ष केले , पण काही क्षणात आम्ही बसलो तिथे थोडासा धुर येवू लागला .... धावपळ सुरु झाली...सुरक्षेचा उपाय म्हणून आत मधील कॅबिन मध्ये गेलो, तिथे ही धुर आमचा पाटलाग करीत आला, एका मिनिटांत ती खोली धुरांने भरून गेली, धावपळ, पळापळ,  आरडा - ओरड सुरु झाली,
नाकातोंडात धूर जाऊ लागल्याने ठसका येऊ लागला,डोळे चूरचूरायला लागले होते.बाहेर जाण्याशिवाय पर्याय नव्हता,बाहेर जाण्यासाठी कॅबीन चा दरवाजा उघडताच धुराचा प्रचंड मोठा लोट अंगावर आला,संपूर्ण पॅसेज काळ्याकुट्ट धूराने व्यापून गेला होता, दोन पावलांवरचे ही काही दिसत नव्हते, मंञालय तसेच पायाखालचे !!  डोळ्याला पट्टी बांधली तरी कुठूनही आणि कसेही जाता येईल इतक्या ओळखीचे होते. त्यामुळे तसाच त्या अंधारातही भिंतीचा आसरा घेऊन डोळे घट्ट मिटून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला,  माञ अंधारात आपण चालू शकू पण नाकातोंडात जाणार्‍या धुरामुळे काही क्षणात बेशुद्ध होऊ याचीही जाणीव झाली. त्या क्षणाला  Sixth Sense जागा झाला आणि थांबलो! विचार केला  की ज्या खोलीत आपण थांबलो ती मंञालयाच्या आतील भागात उघडत होती तर अगदी चार पावलांवर त्याच्या समोरच्या बाजूला असलेली मंञ्यांची केबीन मंञालयाच्या बाहेर दर्शनीय भागात उघडणारी होती. त्यामुळे खाली न जाता समोरच्या केबीनमधे जाण्याचा निर्णय घेतला.एकमेंकाच्या हाताची साथ घेऊन समोरची केबीन गाठली. ते मंञ्यांचे दालन असल्याने हवाबंद आणि  थोडेसे सुरक्षीत असल्याने त्या कक्षात आणखी धूराचे लोट पोहचले नव्हते. त्यामूळे तिथे थोडासा धीर आला,हा थोडासा समाधानाचा क्षणही क्षणभरच टिकला, ती केबीन ही धूराने पाहता-पाहता गच्च भरली. 
फटाक्याची माळ पेटत-पेटत जावी त्याप्रमाणे रूममधील एक एक  वस्तू पेट घेत होती,खिडकीला लागून असलेल्या पाईपला धरून चौथ्या मजल्यावर जाणे शक्य होते.. सिंमेटचा पाईप तो बाहेरची गरमी आणि आगीच्या झळांमूळे तो ही तापला होता.एकीकडे पाईपला हात लावताच बसणारे चटके,खाली न जावे तर आतमधे उभा टाकलेले मरण आणि गरम पाईपला धरून खाली उतरताना तोल जाऊन पाचव्या मजल्यावरून खाली पडण्याची आणि पर्यायाने मरणाच्या च्या जवळ जाण्याचीच तिसरी शक्यता.. चोहूबाजूंनी मृत्यु  दिसत होता.कूठला तरी पर्याय निवडणे भाग होते. पाईपला धरून खाली उतरणे हा तसा थोडासा सोपा पर्याय निवडला,पाचव्या वरून चौथ्या मजल्यावर आलो.खिडकीच्या सज्जाचा भक्कम आधार मिळाला.एका छोट्याश्या सज्जावर 35-40 जणांची गर्दी, खाली बघ्यांची नुसतीच गर्दी आणी आरडाओरड . मदत करण्याची इच्छा असूनही ते सर्व हतबल होते.

दुसरीकडे समोर मृत्यु उभा असतानाही अंगातला पञकारीतेचा गुण जात नव्हता. मोबाईलद्वारे फोन करून काही वाहीन्यांच्या पञकार मिञांना घटनेची माहिती दिली.टिव्हीवर ब्रेंकींग न्यूज सुरू झाल्या.काही वाहीन्यांवर माझ्या नावाची पट्टी आणी मी अडकल्याची पट्टी झळकू लागली.आणि एका वाहिनीने तर चक्क फोनवरून लाईव्ह प्रतिक्रीया घेताना एकीकडे धीर देत त्याच्या स्टाईलमधे 'आता नेमकं तिथे कस वाटतंय ? काय अनुभवता आहात असे ? पराकोटीचे प्रश्न ही विचारले..
 पुढचा प्रसंग काय येणार हे माहीत नव्हते.घरी एकदा बोलून घ्यावे या विचाराने सौ. ला फोन केला तर त्या वामकुक्षीच्या अधीन गेलेल्या, बोलणे काही झालेच नाही. साडेतीन वर्षापूर्वीही सोशल मिडीयाचा तेवढाच नाद !! या जिवघेण्या प्रसंगातही मंञालयाला आग पाचव्या मजल्यावर अडकलो, felling घाबरलेला !!! अशी पोस्ट टाकून मोकळा झालो.. चौथ्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी आता पाईप ही नव्हता.खाली कसे जावे ? हा प्रश्न होता. पाठीमागे मंञालय धडधडा जळताना दिसत होते,तिथे कुठल्याही क्षणी खिडकीतून आग आमच्यापर्यंत पोहचणार होती.सर्वांनी आपले शर्ट काढून त्याची दोरी बनवून त्या द्वारे खाली उतरण्याचा विचार सुरू केला. या पर्यायातही  मृत्युचाच धोका होता. दरम्यानच्या काळात टिव्हीवरील बातमी आणी फेसबूकवरील स्टेटस पाहून मिञाचे,नातेवाईंकाचे आणि परिचितांचे फोन यायला सुरवात झाली. प्रतिक्रियेसाठी आता हिंदी,इंग्रजी वाहीन्यांचे फोन येणे सुरू झाले होते. एकीकडे जिव कसा वाचवावा हा प्रश्न ??  दूसरीकडे हा फोनचा वैताग !
खालून कूठलीही मदत येताना दिसत नसल्याने संयम सुटत चालला होता. सज्जावर सोबत असणा-या दोन तिन महीला कर्मचा-यांचे  वेळापासून रडणे सुरू झाले होते. गोंधळातून त्याचे रडणे कानावर पडले की आमच्याही जिवाची घालमेल सुरू व्हायची. दोन क्षणासाठी डोळे बंद केले आणी भिंतीच्या आधाराने डोके टेकवले तोच आणखी एक शाॅक बसला. एवढ्या गर्मीतही कपाळावर थंड थेंब पडत असल्याची जाणीव झाली आणि दोन सेंकदाची तंद्री ही हरवली. थेंब कोठून येत आहेत म्हणून वर पाहीले आणि इतका वेळ धीर धरून ठेवलेले हातपाय आता गळायला लागले होते. सहाव्या मजल्यावरील खिडकीतून खाली न येता आल्याने आणि धूराच्या ञास ने बेशुद्ध आणि  गतप्राण झालेल्या एका माणसाच्या तोंडातल्या  फेसाचे ते थंड थेंब होते. क्षणभर काहीच सुचले नाही. आता सर्व संपले याची खाञी पटू लागली.. गरम झालेल्या खिडकीचा सज्जाही कुठल्याही क्षणी आम्हाला घेऊन खाली कोसळणार होता. काय करावे सुचत नसतानाच पुन्हा एक अंधूक आशा दिसली. फायर ब्रिगेडचे लोक त्याच्यांकडील उंच शिडी घेऊन आमच्यापर्यंत पोहचत होते. थोडासा धीर आला.
 त्या शिडीने सज्जावर अडकलेली माणसे खाली घेऊन जाऊ लागली. एका वेळी त्या शिडीत चार लोक बसायचे, फायर ब्रिगेडच्या नियमाप्रमाणे सर्वात आधी लहान मुले-महीला नंतर वयोवृद्ध नागरिक आणि  सर्वात शेवटी आमच्या सारखी तरूण मंडळी असा क्रम ठरला होता. माझा नंबर जवळपास शेवटच्या फेरीतच आला. सज्जावरून शिडीत जाताना उडी मारावी लागायची ही उडी मारतानाही तोल जाऊन कोसळण्याची भिती म्हणजे आणखीही मृत्युचा  पाठलाग संपला नव्हता. अखेर जवळपास संपुष्ठात येवू लगलेला जिव तसाच मुठीत घेऊन देवाचे नाव घेत शिडीत उडी मारली आणी सुखरूप खाली पोहचलो.. .. खाली येताच पञकार मिञांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. कॅमेराचे फ्लॅश आणि  लखलखाट धूराने काळा झालेला चेहरा अधिकच गडद करून दाखवीत होता.गरम झालेले डोके शांत करण्यासाठी चार बाटल्या डोक्यावर ओतूनही ते शांत होत नव्हते. मिञाच्यां साहाय्याने तसाच अर्धा तास शांत बसून होतो. .. 58 मिनीटांचा मृत्यूचा अनुभवलेला थरार संपला होता..........पण त्या 58 मिनिटांची स्मृति कायमची राहिली होती.
( अडिच वर्षापूर्वी मंत्रालय आगीत अनुभवलेला सत्य प्रसंग ) 
या घटनेनंतर घरी परत जाताना एक विचार करू लागलो आपण दूपारी मंञालयात गेलो नसतो तर या प्रसंगातून वाचलो नसतो का ? हा विचार आला आणि मी कसा वाचलो याचाही विचार करू लागलो.. मि ज्या कामासाठी कंटाळा न करता मंञालयात गेलो त्या कामामध्ये दोन कामे ही गरीब कॅन्सर पिडीतांना मदत मिळवून देण्याची होती. ही कामे त्याच दिवशी माझ्या जाण्यामुळे मार्गी लागली होती. कदाचित त्या गरीब रूग्णांसाठी मी केलेली छोटीसी मदत त्याच्यां सदिच्छा यामुळेच मी यातून वाचू शकलो..

वाडा ते घर

वाडा ते घर .....

गणेशपार म्हणजे परळी शहरातील जूना भाग. याच भागातील आमचा चिरेबंदी वाडा...त्याला किल्ल्या सारखे मोठे सागवान लाकडाचा दरवाजा...हा दरवाजा बंद करतांना कड़ी सोबत एक आगळ असायची. ( आगळ म्हणजे भिंतिच्या दोन्ही बाजूला एक चौकोन त्यात एक चौकोणी जाड लाकुड लावायचे ) ही आगळ लावणे सोपे पण काढ़णे खुप अवघड. पण त्यामुळे 100% सुरक्षेची खात्री. 
दरवाजा मधून आत गेल की नजरेत भरायच् मोठ आंगन अन् समोर 18 खनाचे माळवदी घर... या 16 खनात 4-4 खनाच्या 4 खोल्या ....या खोल्या म्हणजे एक स्वयंपाक घर ज्यात चुलीवर स्वयंपाक व्हायचा ...दूसरी खोली म्हणजे कोठी (आजची स्टोर रूम ) तर समोर 8 खणाची ओसरी ( आजचा शब्द म्हणजे हॉल ) राहिलेल्या 4 खणा पैकी 2 खनातुन या घरा मागच्या परसात जाणारी बोळ अन् 2 खणातुन माडीवर जायचा जीना.... माड़ी म्हणजे 20 खणाचा समोरची बाजू एक बाजु मोकळा असलेला किमान 30 by 30 चा हॉल .... अंगनात दोन्ही बाजूने प्रत्येकी 2 पत्राच्या खोल्या....तर परसात 4 पत्राच्या खोल्या... अंगणात एका संडास बाथरूम सह वर छप्पर नसलेली नहानी ( आजची बाथरूम ) अंगणात एक रोज किमान 5 फळे लागणारे अंजिराचे झाड़ तर परसाद आमच्या घरालाच् नाही तर आजु बाजूच्या 4 वाड़याला हवा देणारे विशाल लिम्बाच झाड़... सोबतच् एक जांभाचे झाड़....या वाड़यात माझा जन्म झाला.  8 ख़ण अन् एका माडित आमचे 5 मोठे आम्ही 6 मूल असे 11 जणांचे कुटुंब.... वाड़यातल्या 8 खोल्यात 8 भाड़ेकरू ....त्यांचे भाड़े किती तर किमान 25 ते जास्तीत जास्त 60 रु महीना....

भाडेकरु ही मुलासोबतचे ..अक्ख्या वाड़यात मिळून 40 ते 50 मानस सुखैनैव नांदायचो.... उन्हाळ्यात अंगणात अन् परसात एका ओळीने तर दुपारच्या उन्हात बोळीत झोपायचो... एक नळ 40 माणसाला पानी पुरवायचा तर कधी पाणी न आल्यास वाड़यातील आडाचा आधार असायचा .... लाईट होती पण लोड शेडिंग कधी नसायची.... सकाळी 6 उठायला लागायच कारण आई - आजीला शेनान घर सारवायला लागायच.... आंगन इतके मोठे की क्रिकेट पासून ते वीटी दांडू पासून गोट्या , कोया खेळायला पुरायच.... सकाळी झाडावर जाऊन मनसोक्त अंजिर खायची .... दुपारी लींबाच्या लिम्बोल्या जमा करून त्या विकायच्या हा आमचा नित्य क्रम.... एक रेडीओ सोडता tv चे  सातवी पर्यन्त दूर दर्शनच् होते तर फ़ोन आठवीत असताना पाहायला मिळाला... पावसाळ्यातील अंघोळ म्हणजे वरुन पावसाचे पाणी अन् सोबत बकिटातले गरम पाणी.... पण सर्व एन्जॉय करायचो....याच्या बाहेर काही वेगळ अस घर असत हे माहीत असूनही ना कधी त्याची खंत वाटायची की रुखरुख ....कारण जे आहे त्यात समाधान मानायचे होते  संस्कार ..
काळानुरूप सर्व बदलल ..झाडे तूटली... हवा देण्यासाठी पंखे आले... पत्रयाच्या खोलीत राहणारे भाड़ेकरु मिळेनासे झाले.... गल्लीत 24 तास पाणी देणारा बोअर येवूनही पाणी पुरेनासे झाले.... invertor आले पण त्याच्या लाईटनेही समाधान वाटेनासे झाले... 40 माणसे राहणा-या वाडयात 6 मोठया  अन् 4 लहान माणसाला जागा कमी पडू लागली अन् आलेले पाहुणे कधी जातील असे वाटू लागले.....
बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणतात.... काळानुरूप झालेल्या बदलाला अनुसरुन आहे त्याच जागेवर नव घर बाँधताना आज या वाड़यातील एक प्रवेश द्वार सोडता  जुन्या सर्व स्मृती मोडीत काढाव्या लागल्या.... आज या विशाल जागेत साकारले आहे एक दुमलजी 6 खोल्याचे घर.. जिथे सर्व जागच्या जागी आहे... सर्व सोयी सुविधा आहेत  पण त्याही पेक्षा एक मोठे समाधान आहे अन् ते म्हणजे आम्ही याच मातीत आहोत,....याच जागी आहोत ... जिथे आहेत आमच्या लहान पणीच्या आठवणी ...अन् इथेच् झालेले संस्कार ...... जी शिदोरी आम्हाला द्यायची आमच्या कुटुंबातील मुलांना ......
- प्रशांत जोशी.
18/11/2015



Friday, May 27, 2016

मुन्न्याचा सैराट


* मुन्न्याचा सैराट *

' रात्रीस खेळ चाले' संपल्यावर तरी आपला खेळ होईल या आशेवर बसलेल्या मुन्न्याला वैतागून बायकोने खेकसुन 'रोज रोज काय..झोपा उगी " म्हणून ओरडल्याने थोडासा नाराज होत हातात मोबाईल घेउन मुन्न्या बेडवर पडला, अन आपल्या 'मैत्री...' या शाळेतल्या मित्रांच्या whats up ग्रुपवरचे मेसेज वाचू लागला....

वाचता वाचता मुन्याच्या चेह-यावरचे हावभाव बदलू लागले, नाराजीच्या जागी गालातल्या गालात हसू उमटू लागलं, त्याच कारणही तसच होत... सगळे मित्र ग्रुपवर आपण सैराटमधल्या परश्यासारखे दिसतो हि चर्चा करत आहेत हे वाचून मुन्या मनोमन सुखावला होता....

मुन्न्याच्या पेंगलेल्या डोळ्यात एक तरतरी आली अन पटकन त्याने आरशासमोर उभे राहुन स्वतःला पाहिले अन मनातल्या मनात " प्रशांतने बरोबर ओळखले हरामखोराने...माझ्या किंवा ईतरांच्या लक्षातच कसे आले नाही " म्हणत खुष होउन मागुन पुढुन आरशात बघु लागला .ईतक्यात खस्सकन एक आवाज कानावर पडला.

" झोपा ओ..लाईट बंद करा आदी...झोपु द्या जरा..सकाळी first shift आहे न..डबा करायला सकाळी पाचला उठायचय.."..मुन्न्या तातडीने लाईट बंद करुन बायको शेजारी येउन आडवा झाला..हातातल्या मोबाईल अन ग्रुप वरच्या मेसेजवरचे लक्ष काही हटेना...

ईतक्यात विशालने सैराटचा मुन्न्या अन आर्चीचा ( एडिट ) फोटो टाकला..तो बघताच मुन्न्याला काय करु कि असं झाल...बॕकग्राउंडला.."येड लागलं ..येड लागलं रं..." चालुच होत मुन्न्याच्या डोक्यात ..काय लिहाव हा विचार करेपर्यंत भस्सकन हातातला मोबाईल काढुन घेत बायको ओरडली..."झोपा मनलं नं ..". मुन्न्याने बायकोकडे पाठ केली अन झोपला...

पण आता झोपेत कोण आडवणार..स्वप्नात सैराट सुरु झाला ..सुसाट ..फक्त मुन्न्या अन आर्ची..रविची विहीर ..विहीरीवर आर्ची अन तिच्या मैत्रिणी ...अन मुन्न्या रेल्वे पटरीवरुन थर्मलला वळसा घालुन रविच्या विहिरीत उडी ...आर्ची खल्लास...लगेच ..तिच्याकडे बघत मुन्यानेच " मी आवडत नसनं तर बघु नको माझ्याकडे .." अन आर्चीसुद्धा तेवढ्याच तत्परतेने " मी कुठ म्हणल मला आवडत नाही म्हणून .." ..अन मुन्न्या अजुन उंच उंच स्लोमोशन मध्ये आर्चीसोबत मंदिराकडच्या तिर्थावर..डोंगरतुकाई..आमराई...आ हा..हा..!

ईतक्यात बायकोने जोरात धक्का मारुन ढकलले ..." झोपा म्हणले न नीट ..उगी झटु नका अंगाला..मराठीत सांगितलेल कळत नाही..ईंग्रजीत सांगु...? झोपा गप " . मुन्न्या गाढ झोपेत सैराट सुटलेला...झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट गाण्यावर फुल डांन्स..ते आर्चीच वळुन बघन..अन गाण्यानंतर चा तो कि... ..ओठावरुन जिभ फिरवत मुन्न्याचा डान्स..धुसमुसळा डांन्स.....अन मग तो क्षण ..गाडी .,गाडीत आर्ची अन मुन्न्या...मुन्न्याने आर्चीला मिठीत घेतलं ..अन आता तो क्षण..!

खळ खट्ट्याक ...मुन्न्या बेडवरुण धडपडत खाली कोसळता कोसळता सावरला..जागा झाला...अन बायको खस्सकन तार सप्तकातला स्वर लावुन ओरडली...'ऐ मुन्न्या...झोप म्हणल न ...आता माझ्या आंगाला हात लावशील तर उसात कापुन फेकीन उद्या ...झोप गप ..." !
मुन्न्या खडबडुन जागा झाला ...अरे बापरे ...हे काय...ही आर्ची..ईथ झोपनच नको ...हाॕलमध्ये जाउन झोपतो...नाहीतर रात्री आहे कापाकापी...अन पांघरूण घेउन मुन्न्या हाॕलमुध्ये सोफ्यावर ...! सकाळी सकाळी ड्युटीच्या विचारात ...पण चेहऱ्यावर गुलाबी हसु...मस्त वाटलं ...मुन्या मनातच बोलत होता.... आ हा हा ...झोप परशा ...सकाळी लवकर उठायचय..!


Monday, May 9, 2016

खंत...........!

खंत
मागच्या आठवड्यात सैराट पाहीला...अनेक गोष्टींनी मनावर परिणाम केला...पण एक खंत ..खंतच मनायला हवी..आपण सगळे शिकलो...कामाधंद्याला लागलो..कुणी डाॕक्टर..कुणी ईंजीनिअर..कुणी व्यापारी..कुणी सरकारी नौकरी...काहीजण परदेशात पण गेले..जाउन आले...पण कुणी नागराज मंजुळे नाही झाला आपल्या आसपास,  किंवा आपल्यालाही नाही होता आलं ....अवघड मार्गाने कुणी यश मिळवायचा प्रयत्न देखील नाही केला..कदाचित आपल्याला या क्षेत्रात  वा कुठल्याही creative क्षेत्रात काहीच करता येउ नये...मिळवलेल्या गोष्टींचे मोल कमी नाही...पण काही अनमोल अस आपल्याला मीळवताच येणार नाही का? कधीच नाही...ही खंत राहिलीच ना...!
आता कोणी तरी म्हणेल , जे आहोत ते काही कमी नाही. पण असं स्वतःचे समाधान करुन घ्यायची गरज नाही...सगळीकडे एकच सत्य .." बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल.." ...कर्तुत्व हे जगासमोर येउन प्रमाणीत झाल तरच त्याला मान्यता मिळते...अन्यथा कुणी कितीही ढोल बडवले तरीही त्याचा काही उपयोग नसतो...
मुद्दा यश कि अपयश हा नाही...मुद्दा प्रयत्न  ..विचार ..यांचा आहे...आपण सुशिक्षित गुर ढोर आहोत ...अस आपल्या पैकी बरेच खाजगीत बोलुन दाखवतात...खर आहे का ते?
माझ्या बोलण्यातला भाव ज्यांना समजणार नाही त्यांना कदाचित माझ्या वरिल लिहीण्याचा त्रास होईल ...पण मी खंत व्यक्त केली ती फक्त या ग्रुपवरिल सदस्यांपुर्ती सिमीत नाही..आपल्या सर्वांमध्ये कांही creative element असेल का अन असेल तर त्याचे काय..अन सिद्ध कधी होणार...! खंत ही आहे कि आपल्या पैकी कुणाचे भाषण ऐकायला लोक गर्दी करत नाहीत...वेडे होत नाहीत...आपला अभिनय पहाण्यासाठी गर्दी होत नाही..! कुणालाही साहित्य या प्रकारात रस नाही..ज्ञानपीठ कसा मिळणार..! आपल्या फोटोग्राफी..चित्रकलेचे प्रदर्शन नाही..! खेळाडू म्हणून जिल्हास्तरावर नाही...! आपण घेतलेल्या शिक्षणातुन समाजाला उपयोगी पडेल असे एखादे संशोधन नाही..एखाद्या विषयाचा विशेष अभ्यास नाही ..रांजेद्र सिंह सारखे पाणी तज्ञ .आपण लिहीलेल्या कुठल्याही पुस्तकावर ते घेण्यासाठी हॕरिपोटर सारख्या उड्या पडत नाहीत..कि आपण निर्माण केलेला अॕपल सारखा एखादा फोन घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत नाहीत . सैराटला दोन आठवडे न बोलावता वा कुठल्याही आमिषाशिवाय गर्दी आहे...हे यश एकट्या नागराज मंजुळेच कारण creative mind & its output ,,निर्भेळ यश...! असे यश हे रोजच्या जगण्याच्या गोष्टीपेंक्षा वेगळे असते ...! कुठल्याही जगविख्यात मान्यताप्राप्त पुरस्कार आपल्यासाठी नाहीच का..? का तो सुद्धा विकत मिळायला लागल्यावर घेउ...! खंत ही आहे कि आपण creative आहोत पण आपल्याला सवय नाही creativity ची...creative गोष्टींची ...ईतकच..!

©प्रशांत जोशी


Tuesday, April 26, 2016

लेक.........


खरच मूली खुप ग्रेट असतात ..

श्रावण महिन्यात जन्म झाला म्हणून श्रावणी नाव ठेवलेल्या माझ्या लेकिचा आज 11 वा वाढ दिवस. 8 तारखेला जन्म झाला आणि इतरांच्या दृष्टीने शुभ नसलेला 8 हा अंक माझ्या साठी शुभांक झाला, म्हणूनच माझा मोबाइल असो की गाडीचा क्रमांक त्यात 8 हा हवाच.  दिवस किती भराभर जातात, जन्मानंतर 4 महिने श्रावणी ला हातात घ्यायची भीती वाटायची तीच लेक आज आई सारखी माया , प्रेम आणि काळजी करते, 11 म्हणजे ही काही फार वय नाही पण या लाडक्या लेकीने आताच नाही तर लहान पणा पासून हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हट्ट केलेला आठवत नाही की कधी रड़ा पड़ नाही . अभ्यासात हुशार गुणी आणि अतिशय समजदार अशा या लेकिच्या जन्माच्या वेळी जागून आणि हॉस्पिटल मध्ये काढलेली ती रात्र आज ही आठवते. या लेकिची आठवण आली आणि आपल्यावर जीवापाड़ प्रेम करणारी ही लेक एक दिवस लग्नानंतर आपल्याला सोडून जाणार या कल्पनेने ही मी रात्रि अपरात्रि  उठून रडू लागतो,
आज मी घरा बाहेर , वाढ दिवसाला ही थांबता आले नाही, काल तीला ph वर बोलताना विचारले बेटा तुला काय गिफ्ट आणु , तर बोलली पप्पा काही नको, तुम्ही काम संपवून या मग आपण celebrate करू, तिचे शब्द ऐकले आणि डोळ्यात पाणी आले..
खरच मूली खुप ग्रेट असतात ..


Saturday, April 23, 2016

गिफ्ट............

गिफ्ट


परवा एका मित्राचा लग्नाचा वाढदिवस झाला, सहज त्याला विचारले काय गिफ्ट दिले वहीनीला ? तर त्याने 

वरचा हो फोटो पाठवला, अन क्षणभर धडकीच भरली, त्याला बोललो अरे..गिफ्ट छान असतात असे..पण 

त्यानंतर मनात काही विचार अन या पूर्वी असे गिफ्ट दिल्यावर जे सर्वसाधारण प्रसंग डोळ्यासमोर आले ते 

असे, मोकळेपणाने घालता येतील अशी परिस्थिती नसल्यामुळे बहुतांशी असे दागिने बँकांच्या लाँकर मध्येच 

ठेवावे लागतात .त्यातल्या त्यात ज्या दिवशी हे दागिने वापरण्यास काढले जातात...त्यादिवशी व त्यानंतरचा 

पुढचा आठवडा हे घरातले tension वाढवणारेच असतात.असे दागिने घालुन घरच्यांसमोर व पाहुण्यासमोर 

येताना ब-याच बायका खुप दडपणाखाली असतात व त्यांचे कावरेबावरे चेहरे पहाताना सगळ्यांना गोधळुन 

जायला होते.मजेशीर असतो तो दिवस ज्यादिवशी बायका एखाद्या नविन दागिना सार्वजनिक कार्यक्रमात 

पहिल्यांदा घालतात . त्यांना आलेल दडपण त्या वारंवार नव-याला "अहो कसा दिसतोय हा दागिना मला ? " 

हा प्रश्न सारखे आरशात विविध प्रकारे पहात एवढया वेळा विचारतात कि नवरा वैतागून मनातल्या मनात 

कुठुन हिला हा दागिना घेतला असे पश्चतापी भाव चेहऱ्यावर आणतो. ईतरासंमोर जाताना वा गेल्याबरोबरचे  

हावभाव पहाण्यासारखे असतात..किती लाजु अन काय करु की आता असे झालेले असते त्या स्त्रीला .. 

बारकाईने पहा..मनातल्या मनात नवरा हसत रहातो...अगदी आज एखादी मिस युनिव्हर्स बरोबर हातात हात 

घालुन आलो कि काय असे वाटते ..! खरी मजा सुरू होते जेव्हा शेजारच्या वा ओळखीच्या बायका जवळ येऊन 

त्या दागिन्याची चौकशी करायला लागतात अन खोटखोटच, मनातुन जळफळाट होत असुन सुद्धा म्हणतात 

" किती छान आहे ग तुला अगदी शोभुन दिसतोय .""....झाल जग जिंकल्याच्या आनंदात नव-याकडे

समाधानाने पहात ज्या ज्या स्रियांना आवर्जून दाखवने गरजेचे आहे, ज्या स्टेटस नि मोठ्या आहेत व ज्यांचे 

मागचे हिशेब बाकी आहेत ते फेडण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी सुरु होतात.ईतर स्रिया ज्या येताना नव-याबरोबर

हसत हसत आलेल्या असतात पण हा तिचा दागिना पाहुन बिथरलेल्या असतात..अस्वस्थ झालेल्या असतात

व कधी एकदा कार्यक्रम संपतो याची वाट बघत अधन-मधन नव-याकडे जळजळीत कटाक्ष टाकत 

मनातल्या मनात " बघा ते भौजी ..कसे लाड करतात बायकोचे अन तुम्ही ..मेली माझच नशीब फुटक 

म्हणून तुमच्यासारखा गळ्यात बांधुन घेतला " अस म्हणत खाऊ कि गिळु अशा नजरेनं पहायला लागतात..! 

बिचारे नवरे घरी गेल्यावर रात्रीच्या मनोमिलनाचे स्वप्न रंगवत असताना त्यांना जाणीव सुद्धा नसते कि 

आपल्या समोर आज काय वाढुन ठेवले आहे..! त्यातल्या त्यात कार्यक्रम घरचा असेल, एकत्र कुटुंब असेल 

अन सासवा , नंदा..भावजया आसतील तर नव-याला पुढे काय संकट वाढुन ठेवले आहे लक्षात येत नाही. आई

पासुन सगळ्या स्रिया एका क्षणात आपल्या विरोधात कशा जातात याचा अनुभव काही वेळातच यायला 

लागतो . बहिणींचे त्या दिवशीचे हावभाव, टोमणे व्यवस्थित हाताळले तर ठिक नाहितर एखाद्या 

आविस्मरणीय भांडणाला जन्म देउन जातात ..! अन त्या रात्री समस्त नवरे एका वादळाला सामोरे 

जातात...अस काय घडल याचा शोध रात्रभर घेत जागी राहतात ...ज्यांना शक्य असत ते खर्चाच्या तयारीला

लागतात ...ज्यांना शक्य नसते ते लांब राहतात अशा मित्रांपासुन,,,समारंभांपासुन...!